200 हरकती; ५०० स्वाक्षऱ्या!
By Admin | Updated: August 1, 2015 23:42 IST2015-08-01T23:39:20+5:302015-08-01T23:42:30+5:30
बोगदा बंदच : सोमवारी पुन्हा भेटणार आयुक्तांना

200 हरकती; ५०० स्वाक्षऱ्या!
नाशिक : इंदिरानगर ते गोविंदनगरला जोडणारा बोगदा बंद करण्याच्या पोलिसांच्या कृतीला हरकत घेण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या स्वाक्षरी मोहिमेला, तसेच लेखी हरकतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सोमवारी शिष्टमंडळासह जाऊन पोलीस आयुक्तांना स्थानिक रहिवासी आपल्या भावना कळविणार आहेत.
इंदिरानगरचा बोगदा बंद होऊन तीन आठवड्यांपेक्षाही अधिक कालावधी उलटला असून, या बोगद्याचा दररोज वापर करणाऱ्या हजारो वाहनचालकांची त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. बोगद्याला पोलिसांनी पर्याय म्हणून सुचविलेल्या मार्गाचा वापर करण्यास नागरिक अनुत्सुक असल्यामुळे महामार्गावर अन्य ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. नागरिकांची होणारी गैरसोय पाहून बोगदा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पोलिसांकडे विनंती केल्यावरही त्याला भीक घालण्यात आलेली नाही, त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळाचीही बोळवण करण्यात आली.
उलटपक्षी पोलिसांनी नागरिकांकडून लेखी हरकती मागवून आपली मनमानी सुरूच ठेवली. त्यामुळे इंदिरानगरवासीयांनी पोलिसांच्या कृतीविरुद्ध स्वाक्षरी मोहीम राबविली असून, आजपावेतो सुमारे पाचशे नागरिकांनी स्वत:हून निवेदनावर स्वाक्षरी करून आपला पाठिंबा दर्शविला आहे, तर नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी आपल्या संपर्क कार्यालयात नागरिकांकडून लेखी स्वरूपाच्या हरकती मागविल्या असता त्यालाही चांगला प्रतिसाद मिळून दोनशेहून अधिक नागरिकांनी आपली मते खुल्या प्रमाणात मांडली
आहेत.
सोमवारी ही सारी निवेदने घेऊन इंदिरानगरवासीय पोलीस आयुक्तांकडे सुपूर्द करणार असून, तरीही नागरिकांच्या भावनांची दखल न घेतल्यास थेट न्यायालयातच आव्हान देण्याची तयारी केली जात आहे.(प्रतिनिधी)