वीस हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक
By Admin | Updated: August 28, 2015 00:05 IST2015-08-28T00:05:09+5:302015-08-28T00:05:27+5:30
बंदचा परिणाम : गृहिणींकडून जादा खरेदी

वीस हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक
नाशिक : पर्वणीकाळात तीन दिवस नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असल्याने शहराला ताज्या भाजीपाल्याचा पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे गृहिणींनी गुरुवारीच पुढच्या चार-पाच दिवसांच्या भाजीपाल्याची बेगमी करून ठेवल्याचे चित्र होते. दरम्यान, पर्वणीकाळातील बंदमुळे गुरुवारी नाशिक बाजार समितीत गुरुवारी तब्बल वीस हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती.
पर्वणीकाळात शहरात सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंदी असल्याने बाजार समितीत भाजीपाला व अन्य मालाची वाहने येऊ शकणार नाहीत. परिणामी, शहरात ताज्या भाजीपाल्याचा पुरवठा होऊ शकणार नसल्याने गृहिणींनी याची धास्ती घेत बुधवार-गुरुवारीच जादा भाजीपाल्याची खरेदी करून ठेवली. बहुतांश नागरिकांनी थेट बाजार समिती गाठत भाजी घेतली. तर अनेकांनी जवळच्या भाजीबाजारातून जादा भाज्या-विशेषत: फळभाज्या घेऊन ठेवल्या.
नाशिक बाजार समितीत तीन दिवसांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी व गुरुवारी जवळपास दुपटीने भाजीपाल्याची आवक झाली. समितीत एरवी दररोज सुमारे आठ ते दहा हजार क्विंटल भाजीपाला येतो. मात्र आगामी बंदमुळे बुधवारी १४ हजार क्विंटल भाजीपाला आला. त्यात कोथिंबिरीच्या १ लाख ३५ हजार, मेथीच्या ३५ हजार, शेपूच्या २० हजार ३०० जुड्यांचा समावेश होता. गुरुवारीही पहाटेपासूनच बाजार समिती गजबजून गेली होती. एकाच वेळी झालेल्या गर्दीमुळे समितीच्या आवारात वाहतूक कोंडीही होत होती. गुरुवारी दिवसभरात २० हजार क्विंटल भाजीपाला दाखल झाला. त्यात सुमारे चार हजार किलो बटाट्याचा समावेश होता.
भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडून खरेदी करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचीही समितीत गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)