बाल कल्याण समितीची १७ ला सदस्य निवड
By Admin | Updated: August 7, 2015 23:12 IST2015-08-07T23:11:26+5:302015-08-07T23:12:38+5:30
विशेष महासभा : मिळकत धोरणावरही चर्चा

बाल कल्याण समितीची १७ ला सदस्य निवड
नाशिक : महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या नऊ सदस्यांची निवड प्रक्रिया सोमवार, दि. १७ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या विशेष महासभेत केली जाणार आहे. दरम्यान, याच महासभेत मिळकत धोरणावरही चर्चा केली जाणार आहे.
महिला व बाल कल्याण समितीच्या नऊ सदस्यांची मुदत येत्या १३ आॅगस्टला संपत आहे. त्यामुळे समितीवरील नऊ सदस्यांची नियुक्ती महापालिकेतील राजकीय पक्षांच्या तौलनिक संख्याबळानुसार केली जाणार आहे. सध्या समितीवर मनसे - ३, सेना - २, राष्ट्रवादी कॉँग्रेस - २, भाजपा - १ आणि कॉँग्रेस - १ असे पक्षीय बलाबल आहे. सद्यस्थितीत महिला व बाल कल्याण समितीचे सभापतिपद राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे असून, उपसभापतिपद मनसेच्या ताब्यात आहेत. शिक्षण समिती निवडणुकीत कॉँगे्रसच्या उमेदवार वत्सला खैरे यांनी माघार घेऊन महाआघाडीसोबतच राहणे पसंत केले. त्यामुळे महिला व बाल कल्याण समितीचे सभापतिपद कॉँग्रेसला दिले जाण्याची चर्चा होत आहे; परंतु मनसेने अद्याप त्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केल्याने समितीबाबत गुंता वाढण्याची शक्यता आहे. महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपदी आता मनसेच्याच सदस्याची वर्णी लावण्यात यावी, अशी मागणी मनसेतूनही होऊ लागली आहे. त्यामुळे मनसेला अंतर्गत संघर्षालाही सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महासभेत महिला व बालकल्याण समितीच्या नऊ सदस्यांची निवड घोषित झाल्यानंतर महापालिकेच्या मिळकत धोरणावर चर्चा केली जाणार आहे. महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींसंबंधी महापौरांनी नुकतीच सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेऊन एक नियमावली तयार केली आहे. सदर नियमावली महासभेत मंजुरीसाठी ठेवली जाणार आहे.