१७४ कोटींची थकबाकी
By Admin | Updated: April 2, 2017 00:11 IST2017-04-02T00:11:37+5:302017-04-02T00:11:48+5:30
जिल्हा बॅँकेची वणी शाखा : आर्थिक अडचणींचे आव्हान

१७४ कोटींची थकबाकी
वणी : शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून परिचित असलेली जिल्हा बँक सोसायटी व विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचा कर्जपुरवठा करते; मात्र कर्जवाटप व कर्जवसुली यातील असमन्वयामुळे तसेच कर्जमाफीच्या अस्पष्ट धोरणामुळे जिल्हा बँकेच्या वणी शाखेची थकबाकीची रक्कम तब्बल १७४ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरात पोहोचल्याने आर्थिक अडचणीचा सामना करण्याची वेळ जिल्हा बँकेवर आली आहे.
वणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्षेत्रात ३२ संस्थांचा समावेश आहे. त्यात काही आदिवासी सहकारी संस्था (सोसायट्या) तर काही विविध कार्यकारी संस्था आहेत. १२ आदिवासी संस्था, तर २० बिगर आदिवासी संस्था अशी त्यांची वर्गवारी आहे. वणी, मावडी, माळेदुमाला, पिंप्री अंचला, चौसाळे, भनवड, वारे, कोशिंबे, पिंपरखेड, करंजवण, म्हेळुस्के, नळवाडी, खेडले, दहेगाव, लखमापूर, ओझरखेड, आंबे वणी, राजापूर, वरखेडा, जोपूळ, लोखंडेवाडी, मातेरेवाडी, सोनजांब, बोपेगाव, चिंचखेड, तिसगाव, तळेगाव वणी, शिंदवड, खेडगाव, स्मॉल, खेडगाव बु।।, दहिवी, जऊळके वणी अशी त्यांची नावे आहेत. संस्थेचे एकूण खातेदार २७ हजार २१२ आहेत. पैकी संस्थेचे सभासद २०६६७ आहेत. पैकी कर्जदार सभासद १३५१९ आहेत. एकूण येणे कर्ज ३२० कोटी २७ लाख रुपये असून, त्यात कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे.
दरम्यान, कर्जमाफीची मागणी सातत्याने पुढे येत असल्याने थकबाकी भरणाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने कर्ज भरावे की भरू नये, अशी स्थिती निर्माण झाल्याचा सुर उमटतो आहे. त्यात कृषी उत्पादित माल त्यात बहुतांशी टमाटा कांदे द्राक्ष या नगदी पिकांना बाजारभाव अपेक्षित मिळाला नाही. तोही फटका वसुलीला बसल्याची चर्चा आहे.
या सगळ्या द्राविडी प्राणायामाचा लेखाजोखा बघितला तर जिल्हा बँकेला वसुलीसाठी निर्देश देण्यात आले आहेत. त्या कारवाईच्या पूर्ततेसाठी योग्य ती कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे. कारण
काही कर्जदारांची परिस्थिती कर्ज अदा करण्याइतपत नसली तरी ज्यांची आहे त्यांची मानसिकता ओळखून कार्यप्रणाली राबविण्याचे आव्हान संबंधितांपुढे असले तरी थकबाकीचा आकडा पाहता अर्थप्रणालीचा वेग कायम राखणे कामी संबंधिताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. (वार्ताहर)