बायोडिझेलची अवैध विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात १७ पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:06+5:302021-09-04T04:18:06+5:30
मालेगाव (अतुल शेवाळे) : जिल्ह्यात अवैधरीत्या बायोडिझेलची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक ...

बायोडिझेलची अवैध विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात १७ पथके
मालेगाव (अतुल शेवाळे) : जिल्ह्यात अवैधरीत्या बायोडिझेलची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात अवैधरीत्या बायोडिझेलची विक्री रोखण्यासाठी जिल्ह्यात १७ पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीने अंमलबजावणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यासह राज्यभरात बायोडिझेलची विनापरवाना विक्री केली जात आहे. पेट्रोल पंपचालकांच्या वितरणावर परिणाम झाला होता. बायोडिझेलची अवैध विक्री रोखण्यासाठी तेल कंपन्यांसह प्रशासनाची संयुक्त पथके तयार करून तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तपासणी मोहीम राबविण्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यात प्रत्येक तालुकानिहाय पथक नियुक्त करण्यात आले आहे. यात तहसीलदार पथक प्रमुख राहणार असून, पुरवठा निरीक्षक सदस्य, वैधमापनशास्त्र निरीक्षक, तेल कंपनीचे भेसळ विरोधी पथकातील सदस्यांचा समावेश राहणार आहे.
-------------------
जिल्ह्यात सर्रासपणे विक्री
बायोडिझेलची, तसेच बनावट बायोडिझेलची अवैध विक्री जिल्ह्यात सर्रासपणे केली जात आहे. गेल्या १७ ऑगस्ट रोजी मालेगाव शहरालगतच्या रॉयल हॉटेल परिसरातून पोलीस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करून १ हजार १०० लिटर, तर स्टार हॉटेलजवळून १ हजार ६०० लिटर बायोडिझेलसदृश द्रव जप्त केले होते. याप्रकरणी संशयितांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
----
स्वस्त दरात उपलब्ध
नियमित डिझेल व बायोडिझेलच्या दरात मोठा फरक आहे. बायोडिझेल हे स्वस्त दरात उपलब्ध होत असते. त्यामुळे त्याची सर्रास विक्री केली जात आहे. परिणामी शासनाचा महसूल बुडत असतो, तसेच वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. मुळात नियमित डिझेलमध्ये बायोडिझेल बी-१०० अशी भेसळ करून विक्रीला परवानगी आहे. मात्र, भेसळ न करता थेट बायोडिझेल विकले जात आहे. विविध प्रकारच्या घातक रसायनांचा बनावट बायोडिझेल निर्मितीसाठी उपयोग केला जात आहे.
----
नाशिक जिल्हा पेट्रोल, डिझेल वेल्फेअर असोसिएशनने केली होती तक्रार
नाशिक जिल्हा पेट्रोल, डिझेल वेल्फेअर असोसिएशनचे भूषण भोसले व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांच्याकडे जिल्ह्यात बायोडिझेलची अवैध विक्री केली जात असल्याची तक्रार केली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वाहनांमधील इंधनांची तपासणी करावी. पेट्रोल पंप व्यावसायिक व तेल कंपन्यांचे आर्थिक नुकसान होत असून, शासनाचा महसूलदेखील बुडत आहे. त्यामुळे बायोडिझेलच्या अवैध विक्रीबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती.
----
तहसील कार्यालय स्तरावर पथके
जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयाच्या स्तरावर तहसीलदार यांच्यासह पुरवठा निरीक्षक, वैधमापन शास्त्र निरीक्षक, तेल कंपनीचे अधिकारी असलेले पथक नियुक्त करण्यात आले आहे.