1696 रुग्णांची वाहतूक

By Admin | Updated: September 22, 2015 22:56 IST2015-09-22T22:54:56+5:302015-09-22T22:56:57+5:30

सिंहस्थ कुंभमेळा : पर्वणीत १०८ अ‍ॅम्ब्युलन्सने बजावली सेवा

1696 Patients Traffic | 1696 रुग्णांची वाहतूक

1696 रुग्णांची वाहतूक

नाशिक : अपघातग्रस्त, जखमी तसेच आजारी नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारत विकास ग्रुपच्या (१०८ टोल फ्री) रुग्णवाहिकांनी शहरातील तीन शाही पर्वण्या तसेच त्र्यंबकेश्वरच्या दोन पर्वण्यांमध्ये भरीव योगदान दिले आहे़ या रुग्णवाहिकांमधून १६९६ रुग्णांची वाहतूक करण्यात आली असून, ७९ हजार १६८ भाविकांना रुग्णसेवा दिली आहे़
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या पर्वण्यांमध्ये सुमारे एक कोटीपेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. भाविक नदीपात्रात स्नान करताना अनवधानाने घाटावर पाय सरकल्याने होणारे अपघात, गर्दीमुळे वृद्धांना होणारा त्रास, पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाणारे युवक, वृद्ध नागरिकांमधील आजारांमुळे बिघडलेली प्रकृती अशा घटना पर्वणीच्या काळात घडल्या आहेत़ त्यातच अपघात, साथीचे आजार व इतर आजारांच्या परिस्थितीतही भाविकांना १०८ रुग्णवाहिकांनी वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य पार पाडले़ या अद्ययावत व सुसज्ज रुग्णवाहिकांची पर्वणीत चांगलीच मदत झाली़ या प्रत्येक रुग्णवाहिकेत पायलट, डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी, असे कर्मचारी होते़ शासनाने नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थासाठी ८४ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी ठाणे येथील १०, मुंबई १०, पुणे २०, धुळे ५, जळगाव ५, नाशिक ४ अशा ५४ रुग्णवाहिका शहरातील तपोवन, रामकुंडासह सर्व घाट, शाहीमार्ग व विभागनिहाय तैनात करण्यात आल्या होत्या़ तसेच त्र्यंबकेश्वरमध्येही प्रत्येक सेक्टरनिहाय या रुग्णवाहिका उभ्या होत्या.
नाशिकमधील तिन्ही पर्वणीदरम्यान १०८ रुग्णवाहिकेने ९४७ जखमींची वाहतूक करण्यात केली, तर २० हजार रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली. त्र्यंबकेश्वर येथे ७४९ जखमींची वाहतूक करण्यात आली, तर ५९ हजार १६७ रुग्णांना सेवा देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 1696 Patients Traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.