161 घरपट्टी थकबाकीदारांना जप्ती वॉरंट
By Admin | Updated: December 21, 2015 23:34 IST2015-12-21T23:24:20+5:302015-12-21T23:34:45+5:30
कारवाई करणार : पंचवटी विभागीय कार्यालय

161 घरपट्टी थकबाकीदारांना जप्ती वॉरंट
पंचवटी : घरपट्टीची थकीत रक्कम भरावी, यासाठी वारंवार सूचना देऊनही त्याकडे डोळेझाक करणाऱ्या पंचवटीतील सुमारे १६१ थकबाकीदारांना मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने जप्ती वॉरंट बजाविण्यात आले आहे. या थकबाकीदारांकडून मनपा प्रशासनाला जवळपास ३९ लाख रुपयांची थकबाकी वसूल करणे बाकी आहे.
गेल्या आठवड्यापासून हे जप्ती वॉरंट बजाविण्यात आले असून, थकबाकीदारांना मुदत देण्यात आली आहे. थकबाकीदारांनी मुदतीच्या आत घरपट्टीची रक्कम जमा न केल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.
वॉरंट बजावलेल्यांपैकी काही नागरिकांनी मनपाकडे जवळपास दीड लाख रुपयांची थकबाकीची रक्कम जमा केली आहे.
जप्ती वॉरंट बजाविण्यात आलेल्या नागरिकांनी वेळेत कर भरणे गरजेचे असून, जे कर भरणार नाही त्यांना महापालिकेकडून होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. (वार्ताहर)