‘स्वाइन फ्लू’ कक्षात 16 रुग्ण दाखल
By Admin | Updated: March 2, 2015 00:04 IST2015-03-02T00:01:57+5:302015-03-02T00:04:42+5:30
जिल्हा रुग्णालय : खाटांच्या संख्येत केली वाढ

‘स्वाइन फ्लू’ कक्षात 16 रुग्ण दाखल
नाशिक : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा फैलाव वाढत चालला असून, सद्य:स्थितीतील पावसाळी व थंड हवामान या फैलावास पोषक ठरत आहे़ या रोगाने आतापर्यंत शहरात जिल्ह्यातील सुमारे सोळा नागरिकांचा बळी घेतला आहे़, तर जिल्हा रुग्णालयात सोळा रुग्ण उपचार घेत आहेत़ जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे कक्षातील बेड अपुरे पडत असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी रविवारी या कक्षातील बेडच्या संख्येत वाढ केली आहे़
स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली़ या कक्षात सुरुवातीला बेडची संख्या कमी होती़ मात्र रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे त्यामध्येही वाढ करण्यात आली़ शनिवारपर्यंत या कक्षात सोळा बेड होते, मात्र ते कमी पडू लागल्याने आता ही बेडची संख्या पंचवीस करण्यात आली
आहे़
या कक्षात सोळा रुग्ण उपचार घेत असून, त्यामधील तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर त्यांच्या जागी तीन रुग्ण दाखल झाले आहेत़ त्यामध्ये अकरा महिला व पाच पुरुष रुग्ण आहेत़ जिल्हा रुग्णालयातील रुग्ण तपासणी रविवारीदेखील सुरू होती़ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गजानन होले यांनी रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षातील रुग्णांची तपासणी करून रुग्णांचे नातेवाईक व तेथील कर्मचाऱ्यांना कामाबाबत सूचना केल्या़ या कक्षामध्ये काम करणाऱ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यास
सांगितले़ (प्रतिनिधी)