विधान परिषदेसाठी जिल्ह्यात १५ मतदान केंद्रे नाशिकला मतमोजणी : मतदानाचे उमेदवारांना प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:19 IST2018-05-09T00:19:26+5:302018-05-09T00:19:26+5:30
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांना त्यांच्या तालुक्याच्या मुख्यालयात मतदान करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात १५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली.

विधान परिषदेसाठी जिल्ह्यात १५ मतदान केंद्रे नाशिकला मतमोजणी : मतदानाचे उमेदवारांना प्रात्यक्षिक
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांना त्यांच्या तालुक्याच्या मुख्यालयात मतदान करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात १५ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, या निवडणुकीची मतमोजणी मात्र नाशिक मुख्यालयीच करण्यात येणार आहे. मंगळवारी निवडणूक रिंगणातील उमेदवार व त्यांच्या मतदान प्रतिनिधींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे. विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या माघारीनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, राष्टÑवादीचे शिवाजी सहाणे, शिवसेनेचे नरेंद्र दराडे व जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी या तिघांमध्येच सामना होणार आहे. यासंदर्भात एकूणच निवडणूक प्रकिया, आचारसंहिता, मतदान केंद्रांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. नाशिक जिल्ह्णात या मतदारसंघासाठी ६४४ मतदार असून, त्यांना त्यांच्या मुख्यालयी मतदानाची व्यवस्था करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी तहसील कार्यालयात मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्णात १५ मतदान केंद्रे असून, नाशिक मुख्यालयात मात्र तहसील कार्यालयाऐवजी रोहयो शाखेत ही व्यवस्था करण्यात येणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. या निवडणुकीत उमेदवाराची पसंतीक्रमाने निवड करायची असल्याने प्रत्येक उमेदवाराला पसंतीचा कोणताही एक आकडा त्याच्या नावापुढे नोंदविणे मतदारांना अनिवार्य आहे. म्हणजे क्रमांक १, २, ३ अशा पद्धतीने ज्या उमेदवाराला पहिली पसंती असेल त्याच्या नावापुढे १ क्रमांक टाकणे बंधनकारक असणार आहे. मतपत्रिकेवर मात्र अन्य कोणतीही खाडाखोड, विशिष्ट खूण केल्यास मतपत्रिका बाद ठरणार असल्याची माहितीही उमेदवारांना देण्यात आली. मतपत्रिकेवर मत नोंदविल्यानंतर मतपत्रिकेची घडी कशी असावी, याबाबतही प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे.