मराठा मोर्चासाठी येणार १५ लाख समाजबांधव
By Admin | Updated: September 19, 2016 00:32 IST2016-09-19T00:22:54+5:302016-09-19T00:32:17+5:30
नियोजन : मराठा क्रांती मूक मोर्चा कोअर टीम बैठक; सर्व जिल्ह्यांतील गर्दीचे विक्रम नाशकात मोडण्याचा अंदाज

मराठा मोर्चासाठी येणार १५ लाख समाजबांधव
नाशिक : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलगी बलात्कार व खून प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापरामुळे तो रद्द अथवा त्यामध्ये बदल तसेच मराठा आरक्षण या मागण्यांसाठी येत्या शनिवारी (दि़ २४) नाशिकमध्ये मराठा समाजातर्फे मूक मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चामध्ये पंधरा लाखांहून अधिक समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मूक मोर्चाच्या कोअर कमिटीने रविवारी (दि़ १८) पत्रकार परिषदेत दिली़ नाशिक हा राज्यातील दोन नंबरचा जिल्हा असून, हा मोर्चा सर्व जिल्ह्यांतील गर्दीचे विक्रम मोडेल, असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला़
कोपर्डीतील अत्याचाऱ्यांना फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायदा रद्द अथवा त्यामध्ये आमूलाग्र बदलासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे़ याबरोबरच अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाला मूर्त स्वरूप न मिळाल्याने त्याची धग आणि झळ सोसावी लागत असल्यामुळे सर्व समाज एकत्र झाला आहे़
मराठा समाजाचा हा मोर्चा कोणताही समाज, व्यक्ती, जात वा धर्माच्या विरोधात नसून मराठा समाजाच्या मागण्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काढण्यात येत आहे़ मराठा समाजाने केलेल्या अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलास अनेक समाजाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला असून, त्यामध्ये बदलाची इच्छाही व्यक्त केली आहे़
औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड आदि ठिकाणी मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे झाले असून, ते अत्यंत शांतता व शिस्तपूर्वक झाले आहेत़ नाशिकचा मोर्चाही शांतता, शिस्त व संयमपूर्वक व्हावा यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे़ या मोर्चासाठी कोणताही नेता नसून प्रत्येक जण या मोर्चाचा नेता आहे़ या मोर्चासाठी केवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़
या मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी घरूनच जेवण अथवा डबा घेऊन सामील व्हायचे आहे़ याबरोबरच मोर्चात सहभागी झालेल्या महिला तसेच वृद्धांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन मराठा क्रांती मूक मोर्चा कोअर कमिटीने केले आहे़ (प्रतिनिधी)असा असेल मोर्चा२४ सप्टेंबरला शनिवारी शांतता व शिस्तपूर्वक हा मोर्चा काढण्यात येणार आहे़ जिल्हाभरातून येणाऱ्या वाहनांसाठी ठिकठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे़ मोर्चाच्या अग्रभागी लहान मुली, विद्यार्थी, महिला, युवक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, व्यापारी, पुरुष, प्रौढ वर्ग व त्यानंतर पुढारी व नेते असणार आहेत़ तपोवनातून निघणारा हा मोर्चा आडगाव नाका - काट्या मारुती पोलीस चौकी - निमाणी बसस्थानक - पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅण्ड - रविवार कारंजा - महात्मा गांधीरोड - जिल्हाधिकारी कार्यालय व तेथून गोल्फ क्लब मैदानावर जाणार आहे़ गोल्फ क्लब मैदानावर समारोपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी मोर्चाचा समारोप होणार होता मात्र लोकाग्रहास्तव गोल्फ क्लब हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे़ या ठिकाणी २० बाय २० चे व्यासपीठ उभारले जाणार आहे़ या व्यासपीठावर केवळ पाच मुली राहणार असून, त्यापैकी एक मुलगी निवेदनाचे वाचन करेल व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल़ शहराच्या प्रत्येक रस्त्यावरील मोर्चेकऱ्यास निवेदन ऐकू जावे यासाठी सिंहस्थाप्रमाणे साउंड सिस्टीम यंत्रणा उभारली जाणार आहे़ तसेच या मोर्चाच्या छायाचित्रणासाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे़