नाशकात दीड कोटींच्या बनावट नोटा जप्त

By Admin | Updated: December 24, 2016 01:54 IST2016-12-24T01:53:51+5:302016-12-24T01:54:26+5:30

पोलिसांची कारवाई : अकरा संशयित ताब्यात; तीन वाहनेही जप्त; राजकारण्यांचा समावेश; २९ पर्यंत पोलीस कोठडी

1.5 crore fake currency seized in Nashik | नाशकात दीड कोटींच्या बनावट नोटा जप्त

नाशकात दीड कोटींच्या बनावट नोटा जप्त

नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयानंतर हजार, पाचशेच्या जुन्या नोटा बॅँकेत भरण्याची मुदत संपायला आली असतानाच नाशिक शहरामध्ये सुमारे दीड कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्यासह अकरा जणांना अटक करण्यात आली असून, त्यात पुणे व मुंबईमधील संशयितांचाही समावेश आहे.
गुरुवारी (दि़ २२) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून स्कोडा, फोर्ड फिगो व सियाझ अशा तीन वाहनांमधून आलेल्या १ १ संशयितांकडून या १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या़ याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये नाशिक शहर राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी कार्याध्यक्ष छबू नागरे, महापालिकेचे माजी घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील व सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर यांच्यासह अकरा जणांचा समावेश आहे़ पुण्याचा आयकर विभाग व नाशकातील आडगाव पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान संशयितांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़

शहरात कमिशनवर जुन्या नोटा बदलून देणे, बनावट नोटा चलनात वापरणे अशा प्रकारची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी आयकर विभाग व पोलिसांकडे प्राप्त होत आहेत़ त्यातच नाशिककडे बनावट नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती आयकर विभागाच्या पुणे येथील कार्यालयाला मिळाली होती. त्यांनी नाशिकच्या पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आडगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे कामगिरी सोपविली होती़ त्यानुसार त्यांनी नाशकातील आडगावच्या पोलिसांसमवेत मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास धुळ्याकडून येणारी स्कोडा (एमएच १५, सीएम ७००२), फोर्ड फिगो (एमएच ०४, ईएफ ९७०१) व सियाझ (एमएच १५, एफएच २१११) या तीन वाहनांना हॉटेल जत्रासमोर अडवून तपासणी केली असता त्यात बनावट नोटा आढळून आल्या. त्यामुळे या कारमध्ये असलेल्या अकरा संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडे १ लाख ८० हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या नोटावगळता उर्वरित सर्व नोटा बनावट असल्याचे आढळून आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 1.5 crore fake currency seized in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.