१३ लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप
By Admin | Updated: January 5, 2016 23:35 IST2016-01-05T23:19:37+5:302016-01-05T23:35:37+5:30
सोनेवाडी : तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकाच्या चौकशीची मागणी

१३ लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी (भोजापूर) येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी सन २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या काळात सुमारे १३ लाख रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप सोनेवाडी येथील सत्ताधारी गटाचे सुधीर रावले, सरपंच आशा रावले व उपसरपंच मंदाकिनी देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने विविध विकासकामांच्या नावाखाली गैरव्यवहार केला असून, माहितीच्या अधिकारात सर्व प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. पहिल्या मासिक बैठकीत मागील कामांचा आढावा घेताना ग्रामसेवक पी. एस. काशिद यांच्याकडे कार्यालयीन दप्तराची मागणी केली असता, दप्तर आॅडिटला गेले असल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. मात्र, वारंवार मागणी करूनही दप्तर देण्याबाबत काशिद यांनी चालढकल केली. त्यानंतर रावले यांनी माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मिळवली. तेव्हा विविध खात्यांवर निधीचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली. सरपंच व उपसरपंच यांनी मासिक बैठकीत ग्रामसेवक काशिद यांच्याकडे चेक बुक, कॅश बुक व पासबुकची मागणी केली असता, त्यांनी सादर केले नाही व अचानक एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी निघून गेले असल्याचे रावले यांनी सांगितले. गेली पाच वर्षे प्रमिला लहानू सहाणे यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. मात्र, त्यांचे पती लहानू दामोधर सहाणे यांनी चेक, प्रस्ताव, ठराव यावर बनावट सह्या करून गैरव्यवहार केला असल्याचा आरोप रावले यांनी पत्रकार परिषदेत केला.
सन २०१३-१४ या वर्षात गावात पर्यावरण व ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत स्वच्छतागृह कचराकुंड्या व ट्री गार्डसाठी सुमारे ९१ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गावात एकही स्वच्छतागृह नाही. केवळ पाच कचराकुंड्या दिसत असल्या तरी एकही ट्री गार्ड गावात सापडले नसल्याचे रावले यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात वरील वस्तू खरेदी न करता केवळ बिले दाखवून रक्कम काढून घेण्यात आल्याचा आरोप रावले यांनी केला आहे. मुरुम टाकणे, घनकचरा व्यवस्थापन प्रचार व प्रसार, रस्ता कॉँक्रिटीकरण दुरुस्ती, सौरदीप, संगणक दुरुस्ती, रस्ता दुरुस्ती, रोपवाटिका आदि कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
खर्च आणि दप्तरातील नोंदी याचा कोठेही ताळमेळ दिसत नसून, अनेक ठिकाणी खर्चाच्या नोंदी नाही.
गावात अद्याप ११३ कुटुंबे शौचालयाविना आहेत. तरीही गाव हगणदारी मुक्त झाले असल्याचे ग्रामसेवक काशिद यांनी पंचायत समिती स्तरावर कळविले असल्याचे रावले यांनी यावेळी सांगितले. नळपाणीपुरवठा योजना, तेरावा वित्त आयोग, बांधकाम विभाग व विविध हेड यांच्या नावाखाली मागील पाच वर्षांच्या काळात मोठा गैरव्यवहार झाला असून, पंचायत समिती स्तरावरून प्रत्यक्ष कामाची पाहणी, मूल्यांकन व एम. बी. रेकॉर्ड याबाबत काळजी घेतली
असती तर असा प्रकार घडला नसता असेही रावले यांनी सांगितले. या सर्व कामांची तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, याबाबत वरिष्ठ पातळीवर निवेदन देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, विद्यमान ग्रामसेवक पी. एस. काशिद यांच्याशी भ्रमणध्वनीहून संपर्क साधला असता सद्यस्थितीत आपण याबाबत खुलासा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)