सिंहस्थ कामांसाठी पालिकेचे १२७ कोटी खर्च
By Admin | Updated: July 13, 2015 23:56 IST2015-07-13T23:50:27+5:302015-07-13T23:56:22+5:30
शासनाकडून ४८७ कोटी : २०२ कोटींची प्रतीक्षा

सिंहस्थ कामांसाठी पालिकेचे १२७ कोटी खर्च
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने आतापर्यंत नाशिक महापालिकेला ४८७ कोटी १७ लाख रुपयांचा निधी दिला असून, महापालिकेने स्वनिधीतून मार्च २०१५ अखेर सुमारे १२७ कोटी रुपये खर्च केले आहेत. शासनाकडून अद्याप महापालिकेला २०२ कोटी रुपये येण्याची प्रतीक्षा आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेला केंद व राज्य सरकारकडून निधी आला नसल्याची ओरड मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. मात्र, राज्य सरकारने उचललेल्या ७५ टक्के हिश्श्यानुसार आतापर्यंत ४८७ कोटी १७ लाख रुपयांचा निधी महापालिकेला वर्ग केलेला आहे. राज्य शासनाकडून महापालिकेला एकूण ६८९ कोटी रुपये मिळणार आहेत, तर महापालिकेला २३० कोटी रुपयांचा भार उचलावा लागणार आहे.
महापालिकेने आतापर्यंत ५६ कोटी रुपये सिंहस्थ कामांसाठी, तर भूसंपादनासाठी ७१ कोटी रुपये याप्रमाणे एकूण १२७ कोटी रुपये स्वत:च्या तिजोरीतून खर्च केले आहेत. सन २०१३-१४ मध्ये २१ कोटी, तर सन २०१४-१५ मध्ये ५० कोटी रुपये खर्ची पडले आहेत. महापालिकेला सिंहस्थांतर्गत आराखड्यानुसार २०० कोटी रुपयांचा निधी भूसंपादनासाठी खर्च करायचा आहे.
सिंहस्थ कामांसाठी तसेच भूसंपादनासाठी महापालिकेला ३५० कोटी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले असून, त्यातील २६० कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी मिळाली आहे. त्यातील ४५ कोटी रुपये महापालिकेने विकासकामांसाठी उचलत खर्च केले आहेत. महापालिका प्रशासनाने भूसंपादनासाठी आणखी ५० कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता; परंतु स्थायीने सदरचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने महापालिकेला त्यासाठी स्वनिधीतूनच तरतूद करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)