पशुधन औषध खरेदीत १२ लाखांचा घोटाळा
By Admin | Updated: May 21, 2014 00:37 IST2014-05-21T00:02:13+5:302014-05-21T00:37:48+5:30
साहित्य न घेताच दिले कंपन्यांना पैसे : तीन अधिकार्यांवर फौजदारी?

पशुधन औषध खरेदीत १२ लाखांचा घोटाळा
साहित्य न घेताच दिले कंपन्यांना पैसे : तीन अधिकार्यांवर फौजदारी?
गणेश धुरी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील औषध व साहित्य खरेदीत तब्बल १२ लाखांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले असून, या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील खोडवे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या दोन अधिकार्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता आहे. औषधे व साहित्य न घेताच पुणे व मुंबईच्या तीन कंपन्यांना सुमारे १२ लाखांची देयके प्रदान केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरावरून त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात येऊन त्या समितीने चौकशी करून अहवालही राज्य आयुक्तांना सादर केला आहे. विद्यमान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भिकमसिंह राजपूत यांनी १२ मे २०१४ रोजीच गंभीर प्रतिनिवेदन सादर करून या प्रकरणी तिघा अधिकार्यांवर फौजदारी कारवाईसंदर्भात मार्गदर्शन मागविल्याचे कळते. सन २०१२-१३ या वर्षात जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे प्रादेशिक सहआयुक्त, पशुसंवर्धन विभाग, नाशिक यांची तांत्रिक मान्यता न घेताच ४९ लाख ५० हजारांची औषध व साहित्य खरेदी करण्यात येऊन त्यात अनियमितता झाल्याचे विभागाचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर २२ मार्च २०१२ व २९ जून २०१२ या दिवशी मुंबई व पुणेस्थित कंपन्यांना औषध खरेदीचे कार्यारंभ आदेश देऊन त्यांनी औषधे व साहित्य न पाठविताच त्यांना १२ लाख ९०२ रुपये अदा केल्याचे विभागाचे म्हणणे आहे. डॅफोडिल्स फार्मास्युटिकल कंपनीला एमपी सिरीज व पोक्झासिरीन (औषधे) पुरवठा करण्याचे आदेश असताना, पुरवठा न होताच त्यांना एक लाख ५० हजारांचे देयक अदा करण्यात आले. त्याचप्रमाणे एस. पी. एंटरप्राइजेसला शवविच्छेदन (पोस्टमार्टम) सेट अदा करावयाचा असताना, तो न मिळताही चार लाख ४० हजार व मे. ओम कॉपोरेशन, मुंबई या कंपनीला १ ते १८ साहित्याचा पुरवठा करणे अपेक्षित असताना तो न करताही सहा लाख सहा हजारांचे देयक अदा करण्यात आल्याचा ठपका पशुसंवर्धन विभागाने ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील खोडवे, डॉ. राजाराम चोेपडे व डॉ. डी. के. चौधरी यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचे कळते. त्यासंदर्भात अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त यांच्या ५ ऑगस्ट २०१३ च्या पत्रान्वये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. (प्रतिनिधी)