११५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी
By Admin | Updated: March 2, 2017 01:00 IST2017-03-02T00:59:54+5:302017-03-02T01:00:09+5:30
सिन्नर : सन २०१७-१८ च्या ११५ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंगळवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

११५ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी
सिन्नर : सन २०१७-१८ च्या ११५ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंगळवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. कोणतीही करवाढ नसलेला तसेच शहरातील रस्ते आणि बंदिस्त गटारींची कामे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आदि मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. करवाढ नसल्याने सिन्नरकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प ठरला.
नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी अंदाजपत्रकाच्या जमा-खर्चाची मांडणी सादर केली. शासनाकडून आलेल्या विविध अनुदानांतील ३१ कोटी ३१ लाख रुपये नगरपालिकेच्या तिजोरीत शिल्लक असून, मालमत्ता करांसह विविध करांच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत ९ कोटी ६२ लाख ३० हजार रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. बांधकाम विकास शुल्क, जागाभाडे, आठवडे बाजार फीसह विविध फींच्या माध्यमातून तीन कोटी ३० लाख ६० हजार उत्पन्न पालिकेला मिळणार आहे. मुद्रांक शुल्कासह शासनाकडून विविध करांच्या अनुदानातून पाच कोटी ८४ लाख ३२ हजार नगरपालिकेच्या तिजोरीत येतील असा अंदाज धरण्यात आला आहे.
विविध बॅँकातील ठेवींवरील व्याजासह विविध शासकीय करांतील सुटीपोटी एक कोटी ३८ लाख १० हजार रुपये अपेक्षित आहेत. नगरपालिकेचे महसुली उत्पादन ५२ कोटी ४६ लाख ३५ हजार १९५ गृहीत धरण्यात आले आहे.
पाणीपट्टी, घरपट्टी व अन्य करात कुठलीही वाढ न करता रस्ते आणि बंदिस्त गटारींच्या कामांना या अर्थसंकल्पात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. रस्ते बांधकामासाठी दोन कोटी, बंदिस्त गटारीच्या बांधकामासाठी ५० लाख, शौचालय बांधकामासाठी ५० लाख, नायगाव रस्त्यावरील व्यापारी गाळ्यांसाठी तीन कोटी, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनासाठी तनी कोटी, पुतळे उभारणी व हुतात्मा स्मारकासाठी २५ लाख, कडवा पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी दहा कोटी, दलितवस्ती सुधारणा कामांसाठी सहा कोटी, वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी दोन कोटी आणि वाढीव हद्दीच्या विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
बैठकीस उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, गटनेते हेमंत वाजे, सोमनाथ पावसे, गोविंद लोखंडे, शैलेश नाईक, विजय जाधव, पंकज मोरे, बाळू उगले, शीतल कानडी, संतोष शिंदे, नलिनी गाडे, श्रीकांत जाधव, मल्लू पाबळे, प्रतिभा नरोटे, नामदेव लोंढे, अलका बोडके, विजया बर्डे, सुहास गोजरे, सुजाता तेलंग, प्रणाली भाटजिरे, मंगला शिंदे, मालती भोळे, प्रिती वायचळे, रुपेश मुठे, गीता वरंदळ, ज्योती वामने, निरुपमा शिंदे, वासंती देशमुख, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, जनसंपर्क अधिकारी नितीन परदेशी, लेखापाल प्रियंका गांगुर्डे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)