1,12,536 नवमतदारांची नोंदणी
By Admin | Updated: October 28, 2016 00:47 IST2016-10-28T00:35:40+5:302016-10-28T00:47:45+5:30
मनपा निवडणूक : अभियानाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

1,12,536 नवमतदारांची नोंदणी
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी संयुक्तपणे राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत तब्बल एक लाख १२ हजार ५३६ नवमतदारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदार संख्येत सुमारे ८ ते १० टक्क्यांनी भर पडणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका निवडणुकीसाठी शहरात महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी अभियान दि. १५ सप्टेंबर ते २१ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात आले. महापालिकेने सर्व ६१ प्रभागांसह सहाही विभागीय कार्यालयात मतदार नोंदणी कक्ष स्थापन केला होता शिवाय शहरातील २३ महाविद्यालयांमध्येही नोंदणी कक्षाची उभारणी करण्यात आली होती. जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने समोर ठेवले होते. त्यासाठी स्वत: आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यासह संदेशदूत नेमलेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुणाईला आवाहन केले होते. याशिवाय, महापालिकेने चौकाचौकात मतदारांना आवाहन करणारे फलक उभारले होते तसेच सोशल मीडियाचाही आधार घेण्यात आला होता. सहाही विभागांत प्रचाररथ तयार करण्यात येऊन ध्वनीक्षेपकाद्वारे मतदारांना आवाहन केले जात होते. त्याची फलश्रुती म्हणून अभियानात तब्बल एक लाख १२ हजार ५३६ नवमतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. त्यात ६६ हजार ६३५ पुरुष, तर ४५ हजार ९०१ महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच १४३७ मतदारांची नावे वगळण्यात आली असून, २२९३ मतदारांच्या नावात दुरुस्तीसाठी अर्ज प्राप्त झाले आहेत, तर २१३० मतदारांचे स्थलांतराचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वसाधारणपणे मतदार नोंदणी अभियानात सरासरी अडीच टक्के वाढ अपेक्षित धरली जाते. परंतु, महापालिका व जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे राबविलेल्या मोहिमेमुळे सुमारे ८ ते १० टक्क्यांनी मतदारांमध्ये वाढ झालेली आहे. (प्रतिनिधी)