नाशिक जिल्ह्यात ७५ दिवसांत १०६६ कोरोनाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:17+5:302021-04-23T04:16:17+5:30

नाशिक : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रहार बसू लागल्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत मोठी भर पडत असून, वाढत्या ...

1066 corona victims in 75 days in Nashik district | नाशिक जिल्ह्यात ७५ दिवसांत १०६६ कोरोनाबळी

नाशिक जिल्ह्यात ७५ दिवसांत १०६६ कोरोनाबळी

नाशिक : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रहार बसू लागल्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येत मोठी भर पडत असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेशा उपचार सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे; शिवाय रेमडेसिविर इंजेक्शनसाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या ७५ दिवसात एक लाख ६५ हजार २२६ बाधित रुग्ण वाढले असून, १०६६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात बळींची संख्या अधिक वेगाने वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची भयानकता काळजाचा थरकाप उडवत आहे. रोज ४०हून अधिक बळी कोरोनामुळे जात आहेत. त्यातच आरोग्य सुविधा अपुऱ्या ठरू लागल्याने वेळेत उपचार न मिळून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यात साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाबाधितांचा वेग मंदावला होता. जिल्ह्यात ७५ दिवसांपूर्वी ६ फेब्रुवारीला बाधितांचा आकडा अवघा १११ नोंदवला गेला होता. त्यात नाशिक महानगरात ७०, तर ग्रामीण भागात ३९ रुग्ण सापडले होते. त्यानंतर हा आकडा २०० ते २५०च्या दरम्यान राहिला. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून बाधितांचा वेग वाढण्यास सुरुवात झाली. त्यापाठोपाठ बळींचीही संख्या धडकी भरवणारी ठरली. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २०५६ होती. आता ७५ दिवसांनंतर हा आकडा ३१२२वर जाऊन पाेहोचला आहे. बाधित रुग्णांची संख्याही एक लाख ६५ हजार २२६ने वाढून ती आता दोन लाख ८१ हजार ८७७ वर गेली आहे.

इन्फो

६ फेब्रुवारी २०२१ची स्थिती

एकूण रुग्ण - १,१६,६५१

एकूण बळी - २०५६

नाशिक ग्रामीण - ८०८

नाशिक मनपा - १०१९

मालेगाव मनपा - १७६

जिल्हाबाहेरील - ५३

इन्फो

२२ एप्रिल २०२१ची स्थिती

एकूण रुग्ण - २,८१,८७७

एकूण बळी - ३१२२

नाशिक ग्रामीण - १३६७

नाशिक मनपा- १४२८

मालेगाव मनपा- २३३

जिल्हाबाहेरील- ९४

-----------------------------

इन्फो

रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत घट

जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ८१ हजार ८७७ बाधित रुग्णांपैकी दोन लाख ३४ हजार ८६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी ७५ दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.२४ टक्के इतकी होती. आता कोरोनाबाधितांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे बरे होण्याच्या टक्केवारीचेही प्रमाण घसरले आहे. ते प्रमाण २२ एप्रिल रोजी ८३.०५ टक्क्यांवर आले असून, १४.१९ टक्क्यांनी घट झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाची याबाबतही चिंता वाढल्या आहेत. पुरेशा आरोग्य सुविधा पुरवण्याचे भले मोठे आव्हान प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

Web Title: 1066 corona victims in 75 days in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.