२५ प्रभागांमध्ये १०६ अर्ज ठरले अवैध
By Admin | Updated: February 5, 2017 00:37 IST2017-02-05T00:36:47+5:302017-02-05T00:37:04+5:30
छाननी प्रक्रिया : सहा प्रभागांबाबत कायद्याचा काथ्याकूट

२५ प्रभागांमध्ये १०६ अर्ज ठरले अवैध
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी प्राप्त उमेदवारांच्या अर्जांच्या छाननी प्रक्रिया शनिवारी सुरू करण्यात आली. त्यात एकूण ३१ पैकी २५ प्रभागांमधील अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन १०६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये अपक्ष उमेदवारांचाच समावेश आहे. दरम्यान, पंचवटीतील प्रभाग १ ते ३ आणि सिडकोतील २८, २९ आणि ३१ या एकूण सहा प्रभागांमध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांविषयी प्राप्त हरकतींवर रात्री उशिरापर्यंत कायद्याचा काथ्याकूट सुरू होता. छाननीप्रसंगी उमेदवार समर्थकांनी गर्दी केल्याने पूर्व विभागात पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला तर काही ठिकाणी वाद घालणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महापालिका निवडणुकीसाठी एकूण १४७८ उमेदवारांनी २१६१ नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. प्राप्त नामनिर्देशनपत्रांची शनिवारी छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात सायंकाळपर्यंत एकूण ३१ पैकी २५ प्रभागांमधील प्राप्त हरकतींवर सुनावणी होऊन त्यात १०६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यात प्रामुख्याने, जातीचे प्रमाणपत्र योग्य नसणे, तीनपेक्षा जास्त अपत्ये असणे, नामनिर्देशनपत्रात जोडपत्रे नसणे, शपथपत्रे नसणे आदिंसह अनेक त्रुटींचा समावेश होता. प्रभाग ४ मधील २, प्रभाग ५ मधील ८, प्रभाग ६ मधील ४, प्रभाग ७ मधील १५, प्रभाग ८ मधील ३, प्रभाग ९ मधील १, प्रभाग १० मधील १४, प्रभाग ११ मधील १, प्रभाग १२ मधील ६, प्रभाग १३ मधील २, प्रभाग १५ मधील १, प्रभाग १६ मधील १, प्रभाग १७ मधील ३, प्रभाग १८ मधील ५, प्रभाग १९ मधील ४, प्रभाग २० मधील ७, प्रभाग २१ मधील ३, प्रभाग २२ मधील ६, प्रभाग २३ मधील २, प्रभाग २४ मधील १६ आणि प्रभाग ३० मधील २ अर्ज अवैध ठरविण्यात आले. पूर्व विभागातील प्रभाग ३० मध्ये शिवसेनेच्या चारही घोषित उमेदवारांनी अर्जासोबत एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यावर सुनावणी होऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी सेनेचे नीलेश चव्हाण, शकुंतला खोडे, रशीदा शेख यांचे पक्षाच्या नावाने दाखल केलेले अर्ज बाद ठरविले आणि त्यांचे अपक्ष म्हणून अर्ज वैध ठरविले. चौथे उमेदवार विद्यमान नगरसेवक संजय चव्हाण यांच्या वकिलांनी युक्तिवादासाठी मुदत मागून घेतली. त्यामुळे चव्हाण यांच्या अर्जावर येत्या सोमवारी (दि. ६) सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांच्या पक्षीय उमेदवारीचा फैसला होणार आहे. पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ ते ३ मध्येही सेनेच्या उमेदवारांनी कोरे एबी फॉर्म जोडल्याबाबतचे आक्षेप होते. त्यावर रात्री उशिरापर्यंत संबंधित उमेदवारांच्या वकिलांमार्फत खल सुरू होता. तर कॉँग्रेसच्या उमेदवार व विद्यमान नगरसेवक विमल पाटील यांनीही अर्जासोबत केवळ बी फॉर्म जोडल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. मात्र, त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. सिडको विभागातील प्रभाग २८, २९ आणि ३१ या तीन प्रभागांमध्येही राजकीय पक्षांच्या उमेदवारांबाबत हरकती घेतल्या गेल्याने त्याठिकाणी रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती.