एकाच दिवशी १००० टमरेल जप्त
By Admin | Updated: March 11, 2017 00:50 IST2017-03-11T00:49:13+5:302017-03-11T00:50:09+5:30
कळवण : स्थानिक स्तरावर विविध कल्पनेतून बांधण्यात येणाऱ्या शौचालयामुळे राज्यात शौचालय बांधणी अभियानाने गती घेतली आहे.

एकाच दिवशी १००० टमरेल जप्त
कळवण : स्थानिक स्तरावर विविध कल्पनेतून बांधण्यात येणाऱ्या शौचालयामुळे राज्यात शौचालय बांधणी अभियानाने गती घेतली आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने हगणदरी-मुक्तीसाठी घरातून टमरेल जप्ती करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
तालुक्यात स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८६ ग्रामपंचायतीत टमरेल जप्ती अभियान राबविण्यात आले. या अभियानात तालुक्यातून एकाच दिवशी सुमारे १००० टमरेल जप्त केले असून, या टमरेलवर उघड्यावर शौचास बसणाऱ्याचे नाव लिहून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर व पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे यांच्या मार्गदर्शनाने कळवण पंचायत समितीच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. पाण्याने भरलेले टमरेल घेऊन त्यांचा नावासगट पंचनामा करण्याचा निर्णय पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी घेतला आहे. तालुक्यात टमरेल जप्ती मोहीम राबविण्यात आली असून, जप्त केलेल्या टमरेलवर त्या व्यक्तीचे नाव लिहून ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेतला आहे. हागणदारीमुक्त गाव योजनेत सहभाग घेतलेल्या तसेच अन्य गावातील नागरिकांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी वारंवार प्रबोधन करूनही त्याचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. या कारवाईत नेमणूक केलेल्या गावात गुडमॉर्निंग पथकाने सकाळी हजेरी लावली. एकाच वेळी ८६ गावात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, सरपंच,
ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदिंनी सहभाग घेतला. शासनामार्फत शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रु पये अनुदान देण्यात आले असून, ज्यांनी शौचालये बांधली ते नागरिक त्याचा वापर करत नसल्याचे निर्दशनास आले आहे. अशा नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.