तब्बल १०० फूट लांबीचे सलग वारली भित्तीचित्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:52+5:302021-08-17T04:20:52+5:30
नाशिक : महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीने जगाला मोहिनी घातली आहे. मनमोहक अशी ही साधीसुधी चित्रे लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच सकारात्मक ...

तब्बल १०० फूट लांबीचे सलग वारली भित्तीचित्र !
नाशिक : महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैलीने जगाला मोहिनी घातली आहे. मनमोहक अशी ही साधीसुधी चित्रे लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच सकारात्मक ऊर्जा देतात. मराठा विद्या प्रसारक संस्थेतील निवृत्त कलाशिक्षक गोविंद कोठावळे यांनी कंपाउंड वॉलवर आकर्षक चित्रे रंगवली आहेत. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत येणारे सण, उत्सव, समारंभ रेखाटून संपूर्ण वर्ष सलगपणे चित्रित केले आहे. १०० फूट लांबीची ही भिंत आकर्षक वारली चित्रांनी सजली आहे.
कोठावळे यांचे कलाशिक्षक मित्र पी. टी. जाधव व अशोक ढिवरे या कलाशिक्षक मित्रांनी वारली चित्रशैलीत भित्तीचित्र रंगविण्याची कल्पना सुचवली. गेरू रंगाच्या पार्श्वभूमीवर ॲक्रिलिक पांढऱ्या रंगात चित्ररेखाटन केले. वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांच्या वारली चित्रसृष्टी पुस्तकांचा तसेच त्यांच्या नव्या लेखमालेचा खूप आधार झाल्याचे त्यांनी सांगितले. कोठावळे यांनी नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयात फाउंडेशन कोर्स, धुळ्यातून आर्ट टीचर्स डिप्लोमा, तर मुंबईच्या जे. जे. स्कुल ऑफ आर्टमध्ये आर्ट मास्टर कोर्स तसेच जी. डी. आर्ट कोर्स पूर्ण केला. उंटवाडी भागातील कालिका पार्क येथील सरस्वती बंगला व तेथील वारली भित्तीचित्र आवर्जून प्रत्यक्ष बघण्याजोगे आहे.
इन्फो
मराठी नववर्षाचे चित्रण
गुढीपाडव्यापासून ही चित्रमाला सुरू होते. रामनवमी, रथयात्रा, हनुमान जयंतीनंतर वैशाखातली अक्षय तृतीया व ज्येष्ठातली वटपौर्णिमा रंगवली आहे. आषाढात नृत्यात मग्न झालेले मोर दिसतात. श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे सण सजतात. भाद्रपद महिना हरितालिका, गणेशोत्सव घेऊन येतो. अश्विन महिना घटस्थापना, नवरात्रातले दांडिया नृत्य, कोजागरी पौर्णिमा यांच्या उत्साहाने रंगतो. कार्तिकात दिवाळी, भाऊबीज, तुलसी विवाह चित्रांकित झाले आहेत. मार्गशीर्षात पाड्यांवर होणारे विवाह सोहळे चित्रांची रंगत वाढवितात. पौष महिन्यात मकर संक्रांत, इंग्रजी नववर्षारंभ, प्रजासत्ताक दिन रेखाटले आहेत. माघात हळद फोडणे, विवाह समारंभ, गावातील जत्रा दिसते. फाल्गुनात होळी, रंगपंचमी झाली की वर्ष संपते. या सलग चित्रणात देवचौक, तारपा नृत्य, निसर्ग सौंदर्य यांचाही समावेश आहे.
फोटो (१६वारली)
अनोख्या वारली भित्तीचित्रासमवेत गोविंद कोठावळे.