निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी १०० कोटींची गरज
By Admin | Updated: November 13, 2016 01:02 IST2016-11-13T00:49:58+5:302016-11-13T01:02:17+5:30
वारकरी संप्रदाय : कुंभमेळ्यात मंदिर परिसर दुर्लक्षित राहिल्याचा आरोप

निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धारासाठी १०० कोटींची गरज
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केंद्र शासनाच्या तीर्थविकास योजनेअंतर्गत १०० कोटींचा निधी मंजूर करून संपूर्ण मंदिराची काळ्यापाषाणात उभारणी करण्याबरोबरच येथे संतपीठ मंजूर व्हावे, अशी अपेक्षा राज्यभरातील वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे.
संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू व आद्यसद्गुरू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांनी १६ जून १२९७मध्ये त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. या ठिकाणी त्यांचे पुरातन मंदिर आहे. साधारणत: तेराव्या शतकात उभारण्यात आलेल्या या मंदिरास सुमारे ७०० वर्षं पूर्ण झाली आहेत. पंढरपूरप्रमाणेच दरवर्षी पौष वारीला ३०० ते ४०० दिंड्यांच्या माध्यमातून सुमारे ४ ते ५ लाख वारकरी श्री निवृत्तिनाथांच्या चरणी लीन होतात तर उटीच्या वारीला एक ते दीड लाख वारकरी येथे हजेरी लावत असतात. वारकऱ्यांबरोबरच राज्यभरातून लाखो भाविक संत निवृत्तिनाथ संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था ठेवताना संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थानला तारेवरची कसरत करावी लागते. निवृत्तिनाथ महाराज मंदिर परिसरात भक्त निवास, संत निवास, वारकरी शिक्षण संस्था, ग्रंथालय, प्रसादालय, गोशाळा आणि मोफत रुग्ण सेवा आदि उपक्रमांसाठी संत मुक्ताबाई संस्थानप्रमाणे निवृत्तिनाथ संस्थानसाठी तीर्थविकास योजन ेअंतर्गत शंभर कोटींचा निधी मंजूर करावा, अशी अपेक्षा राज्यभरातील वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)