नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेत अर्जांमधील चुकीचे पत्ते आणि पडताळणी प्रक्रियेतील गोंधळ समोर येत असताना शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेत जिल्हाभरातून आतापर्यंत १ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.आरटीईअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाने पहिली लॉटरी जाहीर केली आहे. त्यात समावेश असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ५१७ पैकी बुधवारपर्यंत १ हजार ३२९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ५२२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने ५ ते ३० मार्च दरम्यान आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते.दरम्यान, आरटीइअंतर्गत दाखल झालेले अर्ज आणि पडताळणी प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार होणार असून, प्रवेशाबाबतच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जाणार आहेत. असे असले तरी प्रवेश प्रक्रियेत कोणताही खंड येऊ न देता संपूर्ण प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण केली जाणार आहे.पालकांमध्ये अद्यापही शंकाया प्रक्रियेत जिल्ह्यातील ४५७ शाळांतील ५ हजार ७३५ जागांसाठी तब्बल १४ हजार ९९५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी पहिली सोडत जाहीर झाली असून, या सोडतीमध्ये चुकीची माहिती भरणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळाल्याने काही पालकांनी या प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप नोंदवल्याने यावर्षी ही प्रवेशप्रक्रिया वादात सापडली आहे.
आरटीईचे जिल्ह्यात १ हजार प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:09 IST