१ लाख २० हजार मिळकतींचे सर्वेक्षण
By Admin | Updated: April 27, 2017 01:22 IST2017-04-27T01:22:04+5:302017-04-27T01:22:20+5:30
नाशिक : महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत सुरू केलेल्या मिळकतींच्या सर्वेक्षणात आतापर्यंत १ लाख १९ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले

१ लाख २० हजार मिळकतींचे सर्वेक्षण
नाशिक : महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत सुरू केलेल्या मिळकतींच्या सर्वेक्षणात आतापर्यंत १ लाख १९ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, सद्यस्थितीत पश्चिम, सिडको व सातपूर विभागात काम सुरू असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली. दरम्यान, सदर सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्रुटी आढळून आलेल्या मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत.
महापालिकेच्या दप्तरी सद्यस्थितीत सुमारे पावणेचार लाख मिळकतींची नोंद आहे. परंतु, शहराचा वाढता विस्तार पाहता मिळकतींची संख्या पाच लाखांहून अधिक जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला मालमत्ता कराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होऊ शकतो. त्यासाठीच महापालिकेने मिळकत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून, त्यासाठी नवी दिल्लीच्या जिओ इन्फोसिस टेक्नॉलॉजिक्स या संस्थेची नियुक्ती केली आहे. सर्वेक्षणात मिळकती वगळल्या जाऊ नयेत, याकरिता रस्तेनिहाय व जनगणनेनिहाय छोटे ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. सदरचे ब्लॉक हे जिओ ग्राफिकल नकाशाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक मिळकतीचे जीआयएस मॅपिंग व ब्लॉकनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. दि. १५ डिसेंबर २०१६ पासून सदर सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत पश्चिम विभागात २९ हजार ९५१, सातपूर विभागात ४७ हजार ८०९ आणि सिडको विभागात ४१ हजार ७५१ यानुसार १ लाख १९ हजार ५११ मिळकतींची नोंद करण्यात आली आहे. सदर एजन्सीने सर्वेक्षणासाठी १५० गु्रप तयार केले असून, प्रत्येक गु्रपमध्ये १५ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)