जि.प. निवडणुका राजकीय वातावरण तापवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:13+5:302021-06-24T04:21:13+5:30

मनोज शेलार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. गेल्या दोन वर्षात एकही ...

Z.P. Elections will heat up the political atmosphere | जि.प. निवडणुका राजकीय वातावरण तापवणार

जि.प. निवडणुका राजकीय वातावरण तापवणार

मनोज शेलार

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीमुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. गेल्या दोन वर्षात एकही सार्वत्रिक निवडणूक झाली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या चुरशीतील राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले नाहीत.

कोरोना काळात तेवढे रेमडेसिवीर राजकारण तापले होते.

आता मात्र ग्रामीण भागाचा केंद्रबिंदू असलेले व मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तब्बल ११ गट आणि तीन पंचायत समितीच्या १४ गणांसाठी निवडणूक होत आहे. गट व गणातील सदस्यत्व रद्द झालेले बहुतेक जण मातब्बर व राजकीय घराण्यातील आहेत, त्यामुळे निवडणुका प्रतिष्ठेच्या होऊन राजकीय धुराळा उडणार, हे स्पष्टच आहे. त्यात कोण बाजी मारतो, याकडे आता लक्ष लागून आहे.

जिल्हा परिषदेच्या ५६ गटांपैकी प्रत्येकी २३ जागा या भाजप व काँग्रेसला मिळाल्या होत्या. शिवसेनेला सात तर राष्ट्रवादीला तीन जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. तर शिवसेनेने काँग्रेसला साथ दिल्याने बहुमताची २९ ही मॅजिक फिगर पार करण्यात सेना -काँग्रेस यशस्वी ठरले होते. आताच्या स्थितीत ४५ पैकी काँग्रेसचे २१, भाजपचे १५, शिवसेनेचे पाच तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. निकालानंतर सत्तेचा दोलक कसा राहील, याबाबतही उत्सुकता आहे. ओबीसी आरक्षणामुळे रद्द झालेल्या जिल्हा परिषदेच्या ११ गटांमध्ये सर्वाधिक फटका हा भाजपला बसला आहे. भाजपचे तब्बल सात सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. काँग्रेसचे दोन व शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. याशिवाय पंचायत समिती गणाचा विचार करता, येथेही भाजपलाच फटका बसला आहे. १४ पैकी आठ पं. स. सदस्य भाजपचे होते. काँंग्रेसचे तीन सदस्य, शिवसेना, माकप व एका अपक्षाचा समावेश आहे. विद्यमान सदस्यांना निवडून आणण्याची कसरत आता त्या-त्या पक्षांची व नेत्यांची राहणार आहे. सर्वाधिक लक्षवेधी ठरणारी निवडणूक ही कोपर्ली गटातील राहणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी हे तेथील सदस्य होते. ते शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना त्याच गटातील तत्कालीन भाजपचे पदाधिकारी रवींद्र गिरासे यांनी लढत दिली होती. आता मात्र राजकारणाचे फासे पलटले असून, गिरासे हेच शिवसेनेत आले असल्याने येथे भाजपला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे प्राबल्य या ठिकाणी जेमतेम आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप अशीच लढत या ठिकाणी राहणार आहे. दुसरा लक्षवेधी गट हा म्हसावद राहणार आहे. सभापती राहिलेले अभिजीत मोतिलाल पाटील यांचे सदस्यत्व येथे रद्द झाले आहे. काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना तेथे माजी सभापती भाजपचे भगवान पाटील यांनी जोरदार लढत दिली होती. आताही तशीच लढत रंगण्याची शक्यता आहे. पाडळदेबुद्रूक गटातही गेल्यावेळी लढत रंगली होती. अभिजीत पाटील यांनीच येथे काँग्रेसतर्फे निवडणूक लढविली; परंतु धनराज पाटील यांनी त्यांना पराभूत केले होतेे. कोळदा गटातील लढतही रंगतदार राहणार आहे. योगीनी अमोल भारती या भाजपच्या सदस्य या ठिकाणी निवडून आल्या होत्या. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या शनिमांडळ गटात आताही चुरस पहावयास मिळणार आहे. भाजपच्या रुचिका प्रवीण पाटील या येथून निवडून आल्या होत्या. येथेही शिवसेना जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. रनाळा गटातील निकाल तर निसटता लागला होता. भाजपच्या संध्या वकील पाटील यांना निसटत्या मतांनी शिवसेनेच्या शकुंतला सुरेश शिंत्रे यांनी पराभूत केले होते. यासह इतर गटातदेखील जोरदार लढत रंगणार आहे.

पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये सर्वाधिक आठ गण हे शहादा पं.स.अंतर्गत आहेत. येथे भाजपचे पाच, काँग्रेसचे दोन तर सीपीआयचा एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे. येथे भाजपची सत्ता आहे. नंदुरबार पंचायत समितीमधील पाच जणांचे सदस्यत्व रद्द असून, त्यात भाजपचे तीन तर शिवसेना व एका अपक्षाचा समावेश आहे. येथेही भाजपची सत्ता आहे. अक्कलकुवा पं.स.अंतर्गत केवळ एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले असून, तो काँग्रेसचा आहे. निवडणूक निकालाचा परिणाम या पंचायत समितीच्या सत्ताबदलावर करू शकणारा राहणार नसला तरी लढती या रंगतदार ठरणार आहेत.

Web Title: Z.P. Elections will heat up the political atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.