जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला रोजगार हमी योजनेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:06+5:302021-05-28T04:23:06+5:30
कोठार : तळोदा पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांनी ...

जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला रोजगार हमी योजनेचा आढावा
कोठार : तळोदा पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांनी बैठक घेतली. या वेळी रोजगार हमीचे काम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना ॲड.सीमा वळवी यांनी दिल्या.
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे रोजगार बंद आहेत. त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील सुरू असणाऱ्या कामांची माहिती घेण्यासाठी व कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक घेतली. बैठकीला गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे, तालुका कृषी अधिकारी नितीन महाले, वनक्षेत्रपाल नीलेश रोडे, सामाजिक वनीकरणाचे मोहन शेळके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी बी.बोरकर, एम.आर.जी.एसचे हितेश गिरासे, आदी उपस्थित होते.
बैठकीत रोजगार हमी योजने अंतर्गत राजविहिर येथे गाळ काढणे सार्वजनिक कामे सुरू आहे तर तालुक्यात २३८ घरकुल कामे सुरू असून, ६३२ मजूर काम करत असल्याची माहिती देण्यात आली. वन विभागाकडून २६ कामे सुरू असून, ६४ मजूरांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. सामाजिक वनीकरणातर्फे ३० मजूरांना तर कृषी विभागामार्फत सर्वाधिक ३७ कामांच्या माध्यमातून १२२ मजूरांना काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय एका ठिकाणी शोषखड्डा खोदकाम व अंगणवाडी बांधकाम काम सुरू असून, त्याठिकाणी देखील मजूर कार्यरत आहेत.
बैठकीत वन विभागाकडून रोपवाटिका बाबत माहिती जाणून घेण्यात आली. दरम्यान, बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असणारी अपूर्ण कामे पूर्ण करावीत तसेच कृषी विभागाने जास्तीत जास्त कामे निर्माण करावीत,अशा सूचना दिल्यात.
कोरोना लसीकरणाचाही आढावा
जिल्हा परिषद अध्यक्षा वळवी यांनी पंचायत समितीत घेतलेल्या बैठकीत तळोदा तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या आढावा घेतला. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी बैठकीत माहिती देताना सांगितले की, तळोदा तालुका लसीकरणाच्या बाबतीत तिसरा असून, आरोग्य यंत्रणा लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहे. आरोग्य विभागाकडून लसीकरणबाबत कॅम्प व नियोजन बाबत माहिती देण्यात आली. तळोदा हा आदिवासी बहुल तालुका असून लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृतीवर भर देण्याच्या सूचना सीमा वळवी यांनी दिल्या.