जिल्हा परिषद : घडी बसली आता कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:36 PM2020-02-27T13:36:04+5:302020-02-27T13:36:13+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनेक राजकीय घडामोडी आणि रुसवे-फुगव्यानंतर एकदाची जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन झाली. ...

Zilla Parishad: Now it's time to start working | जिल्हा परिषद : घडी बसली आता कामाला लागा

जिल्हा परिषद : घडी बसली आता कामाला लागा

Next

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनेक राजकीय घडामोडी आणि रुसवे-फुगव्यानंतर एकदाची जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन झाली. इतिहासात प्रथमच जिल्हा परिषदेत कुणी विरोधक नाही. सर्वच पक्ष सत्तेचे वाटेकरी आहेत. त्यामुळे विरोध होणारच नाही अशी भाबडी आशा व्यक्त करीत जिल्हावासी आता ‘विकासाची सुपरफास्ट’ अनुभवण्यास उत्सूक आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे प्रथमच जिल्हा परिषदेत निवडून आलेले आहेत. त्यांच्या जोडीला दोन सिनिअर सभापती मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांना फारशा अडचणी येण्याची शक्यता कमीच आहे. विकासाबाबत व्हिजन ठेवतांना मात्र राजकीय उणी-दुणी बाजूला ठेवावी लागतील तरच ही तीन पायाची सर्कस कार्यकाळ पुर्ण करेल.
जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस, भाजप यांना प्रत्येकी २३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला सात आणि राष्टÑवादीला तीन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस-शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर सभापती निवडीत धक्कादायक घडामोडी घडून भाजपलाही सत्तेत वाटेकरी करून घेतले गेले आहे. भाजप २३ व राष्टÑवादीचे ३ अशा २६ सदस्यांच्या एकत्रीत गटाची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सर्वच पक्ष सत्तेत वाटेकरी झालेले आहेत. काँग्रेसला अध्यक्षपदासह दोन सभापतीपदे, शिवसेनेला उपाध्यक्ष आणि भाजपला एक सभापतीपद अशी सत्तेची वाटणी झाली आहे. काँग्रेस व शिवसेना पुर्ण काळ सत्तेत राहतील अशी अपेक्षा मात्र भाजपच्या सत्तेतील एण्ट्रीने फोल ठरविली आहे. भाजपला सत्तेपासून रोखणाऱ्या शिवसेनेला ते प्रत्येकवेळी कैचीत सापडवतील. दुसरीकडे काँग्रेस सेनेच्या पाठींब्यावर सत्तेत असली तरी विधानसभा निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पालकमंत्र्यांना झालेला विरोध यामुळे दुखावलेले पालकमंत्री शिवसेनेला पदोपदी बॅकफूटवर आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सत्तेची ही सर्कस कशी आणि कितीकाळ सुरू राहील याबाबत जिल्हावासीयांमध्ये संभ्रम कायम आहे.
असे असले तरी सत्ता स्थापन होण्यास दोन महिने होण्यात आले आहे. गेल्या एक वर्षापासून प्रभारी राज आणि प्रशासक याच्यात गुरफटलेल्या जिल्हा परिषदेचा गाडा आता रुळावर आलेला आहे. नवीन पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आशा, अपेक्षा आहेत. अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी या माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्या कन्या असल्यामुळे प्रशासन चालवितांना त्यांना घरातूनच चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी हे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र आहेत. त्यांनाही घरातूनच मार्गदर्शन मिळणार आहे. सभापती अभिजीत पाटील हे दुसºयांदा जिल्हा परिषदेत निवडून आले आहेत. अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. रतन पाडवी यांना देखील मोठा अनुभव आहे. जयश्री पाटील या माजी उपाध्यक्ष दिपक पाटील यांच्या पत्नी आहेत. दिपक पाटील यांचे विकासाचे व्हिजन लक्षात घेता त्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे. निर्मला राऊत या आदर्श ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आहेत. अशी सगळी टिम जिल्हा परिषदेत आहे. मात्र दीड, दोन महिन्यांचा काळ पहाता अध्यक्ष, उपाध्यक्षांना कामकाज समजून घेण्यातच गेला आहे. त्यामुळे आता या टिमने कामाला लागणे अपेक्षीत आहे. आरोग्य, शिक्षण, बांधकाम या विभागातील सावळा गोंधळ गेल्या वर्षभरात चर्चेत आला आहे. तेथे पारदर्शकपणे काम करून तो दूर करावा लागणार आहे. ठेकेदार आणि दलाल यांची दुकानदारी बंद करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्न नगण्य आहे. केवळ शासनाच्या योजना आणि निधीवरच भागवावे लागते. त्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी सर्व मिळून उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही अधिकारी व कर्मचाºयांची वर्षानुवर्ष सुरू असलेली मोनोपॉली मोडीत काढावी लागणार आहे. अशा कर्मचाºयांचे विभाग आणि टेबलही बदलणे गरजेचे ठरणार आहे. यापूर्वीच्या अध्यक्ष आणि सीईओंनी जिल्हा परिषद टेक्नोसॅव्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे.
एकुणच ग्रामिण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेचा गाडा आता वर्षभरानंतर रुळावर आला आहे. उच्चशिक्षीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या टिमने ग्रामिण विकासाच्या योजना पारदर्शीपणे राबवून तळागाळातील लोकांपर्यंत कुठलाही भेद न करता कशा पोहचील या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे एवढीच अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.

Web Title: Zilla Parishad: Now it's time to start working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.