जिल्हा परिषदेला पुन्हा मुदतवाढ शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 20:26 IST2019-04-01T20:26:44+5:302019-04-01T20:26:50+5:30
निवडणूक आयोग : नंदुरबार वगळता इतर तिन्ही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया घेण्याचे निर्देश

जिल्हा परिषदेला पुन्हा मुदतवाढ शक्य
नंदुरबार : धुळे जिल्हा परिषद प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असला तरी नंदुरबार जिल्हा परिषदेबाबत अद्याप काहीही निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला नसल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक आता न्यायालयाच्या निर्णयावरच अवलंबून आहे. त्यामुळे विद्यमान पदाधिकारी व सदस्यांना मुदतवाढ कायम राहण्याची शक्यता आहे.
नंदुरबारसह धुळे, अकोला व वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितींच्या निवडणुकीची प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती. डिसेंबर २०१८ अखेर या जिल्हा परिषदांची मुदत संपत असल्यामुळे आॅगस्ट महिन्यापासून गट, गण रचना व आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पुर्ण करण्यात आली. परंतु याच दरम्यान आरक्षणाच्या मुद्यावरून काहीजण उच्च न्यायालयात गेले. त्यावर न्यायालयाने शासनाकडे स्पष्टीकरण मागविले.
शासनाने आरक्षणाच्या तरतुदीबाबत विधीमंडळ अधिवेशनात तरतूद करण्यासंदर्भात मुदत मागून घेतली. परिणामी नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या. परिणामी चारही जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
तीन महिन्याचा काळ संपला
राज्य शासनाने न्यायालयाकडे तीनन महिन्यांची मुदत मागीतली होती. या मुदतीत शासनाने कुठलाही अहवाल किंवा तरतुदींबाबत दुरूस्ती केल्या नाहीत.परिणामी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया घेण्यासंदर्भात राज्य शासनाला पत्र दिले. नंदुरबार वगळता अकोला, वाशिम व धुळे जिल्हा परिषदांच्या गट, गण रचना आणि आरक्षणाबाबत फारसा बदल होणार नसल्याचे गृहीत धरून राज्य निवडणूक आयोगाने ३० मार्च रोजी अध्यादेश काढून स्थगित करण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. परिणामी मे किंवा जून महिन्यात धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे.
नंदुरबारबाबत निर्णय नाही
निवडणूक आयोगाने धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण व इतर बाबींची स्थगित करण्यात आलेली प्रक्रिया पुढे सुरू करण्याचे निर्देश दिले असले तरी धुळे जिल्ह्यातून विभाजन झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितींच्या या प्रक्रियेबाबत कुठलेही आदेश काढलेले नाहीत. प्रभाग रचना, आरक्षण, हरकती, सुनावणी व राजपत्रात प्रसिद्ध यासह इतर सहा टप्प्यांपैकी चार टप्प्यांची प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. उर्वरित दोन टप्प्यांची प्रक्रिया पुर्ण होताच निवडणुकीची अधिसुचना जारी होणार होती. परंतु न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणूक लांबली. धुळे जिल्हा परिषदेसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
पुन्हा मुदतवाढ शक्य
नंदुरबारचा निर्णय न्यायालयात प्रलंबीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने टाळले असल्याचे बोलले जात आहे. परिणामी विधीमंडळ अधिवेशनात आरक्षण तरतुदीत दुरूस्ती व ते न्यायालयाला सादर करणे आणि न्यायालयाने निकाल देणे या प्रक्रियेनंतरच नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या सर्व प्रक्रियेला किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरली तरी नंदुरबार जिल्हा परिषदेची निवडणूक या वर्षाअखेर किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वी होणे शक्य आहे. परिणामी या कालावधीपुरती पुन्हा जिल्हा परिषदेला मुदतवाढ मिळू शकते असे बोलले जात आहे.