डीबीटी रद्द करण्याला आपले प्रथम प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:47 IST2020-01-04T12:47:23+5:302020-01-04T12:47:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : शासनाच्या योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी ...

डीबीटी रद्द करण्याला आपले प्रथम प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : शासनाच्या योजना आदिवासी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी धडगाव, मोलगी व नळगव्हाण येथे आयोजित जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केला.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांची सभा शुक्रवारी झाली. यावेळी माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, आमदार उदेसिंग पाडवी, रतन पाडवी, हारसिंग पावरा, सी.के.पाडवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष बुला पाटील, बिज्या वसावे, सिताराम राऊत, पिरेसिंग पाडवी, शितल पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री अॅड.पाडवी म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या टीबीटीचा निर्णय रद्द करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. शासनाच्या योजनांचा वेग गेल्या पाच वर्षात कमी झाला होता. जनता अनेक योजनांपासून वंचीत राहिली आहे. भाजप सरकारच्या आदिवासी विरोधी धोरणामुळेच ते झाल्याचा आरोप त्यांनी केला. आदिवासी विकास विभागात झालेल्या घोटाळ्यांचा उल्लेख करीत त्यांनी विरोधी नेत्यांवर आरोप केला.
जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसचे योगदान मोठे आहे. काँग्रेसच्या काळातच जिल्ह्यातील दुर्गम भागात पायाभूत विकास झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जनता नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. अॅड.पद्माकर वळवी, उदेसिंग पाडवी यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.
मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी नळगव्हाण, ता.तळोदा येथे माजी मंत्री दिगंबर पाडवी यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर तेथे त्यांनी कार्यकर्त्यांनशी संवाद साधून छोटेखानी सभा देखील घेतली. त्यानंतर मोलगी व धडगाव येथे त्यांच्या सभा झाल्या.
दरम्यान, मंत्रीपद मिळाल्यानंतर ते प्रथमच धडगाव तालुक्यात आल्याने त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.