यंदाही विघ्नहर्त्याच्या उत्सवावर कोरोना विघ्नाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:46+5:302021-09-06T04:34:46+5:30

ब्राह्मणपुरी : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून देवीदेवता पडद्याआड असतानाच आता त्यांच्या उत्सवांवरही कोरोनाचे ग्रहण दिसून येत आहे. मागील वर्षाप्रमाणेच ...

This year too, the Corona Vighna is on the verge of disruption | यंदाही विघ्नहर्त्याच्या उत्सवावर कोरोना विघ्नाचे सावट

यंदाही विघ्नहर्त्याच्या उत्सवावर कोरोना विघ्नाचे सावट

ब्राह्मणपुरी : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून देवीदेवता पडद्याआड असतानाच आता त्यांच्या उत्सवांवरही कोरोनाचे ग्रहण दिसून येत आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाच्या गणेशोत्सवासाठीही शासनाने बाप्पांच्या आगमनापासूनच विसर्जनापर्यंत अटीशर्ती ठरवून दिल्या आहेत. या अटींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याने मंडळांची अडचण वाढली आहे. मात्र, शहरासह ग्रामीण भागातील काही मंडळांनी परंपरेला खंड पडू नये यासाठी मागील वर्षाप्रमाणेच शासन आदेशाचा आदर करीत उत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याचे सांगितले. बहुतांश मंडळांकडून यासाठी होकार दर्शविला असतानाच काही मोजक्या मंडळांनी यंदाही कठीणच असल्याचे सांगितले. देशात मागील वर्षी २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू व २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आलेल्या सर्वच सण व उत्सवांवर विरजणच पडले. शासनाने दिलेल्या शिथिलतेनंतर आता सर्व व्यवहार सुरळीत होत असतानाच मंदिरे अद्यापही बंद आहेत. यावरून कोरोनाचा कहर देवालाही भोवल्याचे चित्र आहे. यंदा १० सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. पण यंदाही विघ्नहर्त्याच्या आगमनातच विघ्न येत असल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे लोकांची गर्दी होऊ नये या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे तर यासाठी शासनाने मंडळांना अटीशर्ती ठरवून दिल्या आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावेच लागणार आहे हेसुद्धा स्पष्ट केले आहे. या अटीशर्तीमध्ये बाप्पांची मूर्तीच काय त्यांच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत सर्वच बाबींचा समावेश आहे. नेमकी ही बाब मंडळांना अडचणीची ठरत आहे. शासनाच्या या अटीशर्ती व त्यावर मंडळांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश मंडळांनी बाप्पाच्या उत्सवाची परंपरा खंडित होऊ देणार नसून, आदेशांचा आदर करून उत्सव साजरा करणार असे सांगितले. तर काही मोजक्या मंडळांनी मात्र, एवढ्या अटीशर्तीमध्ये उत्सव साजरा करता येणार नसल्याचे सांगत यंदा कठीणच असल्याचे सांगितले.

Web Title: This year too, the Corona Vighna is on the verge of disruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.