बियाण्यांच्या गुणवत्तेवर यंदाही भरारी पथकांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:29 IST2019-05-17T21:29:04+5:302019-05-17T21:29:21+5:30
नंदुरबार : दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रात होणाऱ्या खरीप पेरण्यांसाठी यंदाही खते आणि बियाण्याचे आवंटन होणार आहे़ यातील ...

बियाण्यांच्या गुणवत्तेवर यंदाही भरारी पथकांची नजर
नंदुरबार : दोन लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रात होणाऱ्या खरीप पेरण्यांसाठी यंदाही खते आणि बियाण्याचे आवंटन होणार आहे़ यातील बियाण्यांची गुणवत्ता तपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर सात पथकांची निर्मिती कृषी विभागाने केली आहे़
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ़ बी़एऩपाटील व कृषी विकास अधिकारी पी़एस़लाटे यांंनी संयुक्तपणे या पथकांची निर्मिती केली आहे़ जिल्हा परिषद कृषी विभागाने राज्य कृषी विभागाकडे १ लाख ५८० मेट्रीक टन खतांची मागणी नोंदवली होती़ हे खत येत्या काळात जिल्ह्यात येणार आहे़ अनुदानित तत्त्वावर या खतांची विक्री करण्याचे आदेश आहेत़ तत्पूर्वी ३० मे पासून जिल्ह्यात बियाण्यांची व्रिक्री सुरु होण्याचा अंदाज आहे़ यासाठी ३७ हजार ७८३ मेट्रीक टन बियाणे मागवण्यात येणार आहे़ यात ४ लाख ६५ हजार पाकिटे बियाणे हे कापसाचे आहे़ गेल्या काही वर्षात बोगस बियाण्यांमुळे शेतकºयांना फटका बसून त्यांच्या उत्पन्नात घट आल्याचे प्रकार घडले आहेत़ यामुळे कृषी विभागाकडून गेल्या वर्षापासून बियाणे येण्यापूर्वी त्यांचे नमुने प्रयोगशाळेतून तपासून मान्यता देण्यात येत आहे़
गेल्या वर्षात जिल्हा परिषद कृषी विभागाने तपासणी केलेल्या १५५ तर राज्य शासन कृषी विभागाने १६५ बियाणे नमुने संकलित करुन त्यांची तपासणी केली होती़ यातील ३ बियाण्यांचे नमुने दोषी आढळल्याने त्यांची विक्री थांबवण्यात आली होती़ तिन्ही कंपन्यांवर बियाणे नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली होती़ तसेच गतवर्षी भरारी पथकांनी जिल्ह्यातील विविध भागात भेटी देत बियाणे नमुने चाचपणी केली होती़ यात सहा बियाणे हे बोगस असूनही त्यांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले होते़ सर्व सहा बियाणे विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करुन न्यायालयीन कारवाई सुरु आहे़ यंदाच्या वर्षात बोगस बियाणे विक्री आढळून आल्यास तात्काळ कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत़