यंदा पाच एचआयव्हीग्रस्त जोडपी विवाहबद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:43 IST2019-11-27T11:43:20+5:302019-11-27T11:43:28+5:30

हिरालाल रोकडे ।  लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एचआयव्ही या दुर्धर आजाराबाबत समाजात जनजागृती व्हावी व या आजाराने त्रस्त ...

This year, five HIV-positive couples will get married | यंदा पाच एचआयव्हीग्रस्त जोडपी विवाहबद्ध होणार

यंदा पाच एचआयव्हीग्रस्त जोडपी विवाहबद्ध होणार

हिरालाल रोकडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : एचआयव्ही या दुर्धर आजाराबाबत समाजात जनजागृती व्हावी व या आजाराने त्रस्त रुग्णांना सामाजिक मान्यता मिळण्यासह त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगण्याची ऊर्जा मिळावी या उदात्त हेतूने जागतिक एड्स दिनाच्या पाश्र्वभूमीवर 1 डिसेंबर रोजी येथील उपविभागीय पोलीस  अधिकारी कार्यालयात एड्सग्रस्तांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे 12 वे वर्ष असून यंदा पाच जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी दिली.
1990 च्या दशकात एड्स या भयानक आजाराने देशात पाय रोवले. या आजाराने ग्रस्त रुग्णांना समाजाने वाळीत टाकले. या आजाराने त्रस्त अनेक रुग्णांनी एकाकी जीवन जगले अशांना सामाजिक प्रवाहात आणत त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगता यावे यासाठी सपकाळे दरवर्षी एक डिसेंबरला या विवाह सोहळ्याचे आयोजन करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत दिल्ली येथील स्वयंसेवी संस्थेने त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर सेवा श्री पुरस्कार देऊन गौरविले आहे.  सन 2008 पासून मुंबई येथून या उपक्रमास त्यांनी सुरुवात केली. पहिल्या वर्षी एका जोडप्याचे शुभमंगल लावण्यात त्यांना यश आले. त्यानंतर दरवर्षी संपूर्ण राज्यातील या आजाराने ग्रस्त तरुण-तरुणी, पुरुष अथवा महिला यांचा शोध घेऊन त्या दोघांचा एकमेकांशी परिचय करून त्यांच्या संमतीने विवाह लावण्यात येतो. गेल्या 11 वर्षात जी 22 जोडपी या उपक्रमात विवाहबद्ध झाले आज ते आपला सुखी संसार करीत आहेत. या विवाहामुळे त्यांना आपणही समाजातील एक घटक असतो, आपणासही समाजात सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे.
 या अनोख्या उपक्रमाबद्दल सपकाळे यांनी सांगितले की, 1989 मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस खात्यात भरती झालो. 1990 ला चंद्रपूर पोलीस ठाण्यात नेमणूक झाली. त्याच दरम्यान 1992 ला हेमंत करकरे यांची चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली. त्याकाळी चंद्रपूर येथे महाकाली मंदिराच्या  मागील बाजूच्या परिसरात देहविक्री व्यवसाय होता. या वस्तीत गुंडांचा मोठय़ा प्रमाणात वावर असे. या गुंडांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना नेहमीच जावे लागे. याचदरम्यान करकरे यांनी सांगितले की, या वस्तीत गुन्हेगारी नियंत्रणासह व्यसनमुक्ती मोहीम राबवून देहविक्री करणा:या महिलांच्या मुलांसाठी काहीतरी उपक्रम राबविला पाहिजे. यातून सर्वप्रथम अशा मुलांसाठी शालेय शिक्षणाची सोय केली. त्यानंतर सामाजिक संस्थांच्या मदतीने आरोग्य शिबिर घेणे, एड्सबाबत जनजागृती करणे आदी उपक्रम राबविण्यात आले. 2008 मध्ये हेमंत करकरे हे राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख झाले. याचदरम्यान 26 नोव्हेंबरला मुंबई येथे अतिरेक्यांनी हल्ला केला या हल्ल्यात हेमंत करकरे व अन्य पोलीस जवान शहीद झाले. या शहिदांना कायमस्वरूपी आदरांजली व त्यांचा त्याग नेहमी युवकांसह नागरिकांपुढे आदर्श राहावा यासाठी या        हल्ल्याच्या पाच दिवसानंतर येणा:या जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 1 डिसेंबर 2008 ला पहिला विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर सलग दरवर्षी हा उपक्रम राबवत  असून 11 वर्षात 22 विवाह पार पाडले आहेत.
 या विवाह सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे याचदिवशी यापूर्वी जे या सोहळ्यात विवाहीत झाले आहेत अशा विवाहितांचा लग्नाचा वाढदिवस  साजरा केला जातो. या उपक्रमास परिसरातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, एड्सबाबत काम करणा:या शासकीय-अशासकीय संस्था यांनाही या उपक्रमात सामील केले जाते.  शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात  यंदाही 1 डिसेंबरला पाच जोडपींचे विवाह लावण्यात येणार असल्याची माहिती सपकाळे यांनी दिली.
 

Web Title: This year, five HIV-positive couples will get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.