दीड वर्षात १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू १० जणांना मिळाले सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 11:36 IST2020-12-19T11:36:20+5:302020-12-19T11:36:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शालेय विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूसाठी शासनाकडून ७५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. गेेल्या दीड ...

दीड वर्षात १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू १० जणांना मिळाले सानुग्रह अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शालेय विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूसाठी शासनाकडून ७५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. गेेल्या दीड वर्षात जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवून १४ पैकी दहा जणांना सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळवून दिली. दरम्यान, अनेक पालक या योजनेपासून अनभिज्ञ असून त्यामुळे या योजनेचा लाभ त्यांना घेता येत नसल्याची चित्र आहे. याबाबत शाळांनीच अशा प्रकरणांमध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने राजीव गांधी अपघात विमा योजना राबविण्यास गेल्या अनेक वर्षांपासून सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत खाजगी, शासकीय शाळांमधील यु डायसवर नोंदणी असलेले व प्रवेशीत सर्वच विद्यार्थी पात्र असतात. विद्यार्थ्यांकडून कुठलीही रक्कम वसुल केली जात नाही. अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा १४ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव होते. त्यापैकी १० प्रस्ताव मंजुर करण्यात आले. चार प्रस्ताव देखील लवकरच मंजुर करण्यासाठी शिक्षण विभागाचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
आईच्या बॅंक खात्यावर रक्कम
सानुग्रह अनुदानाची रक्कम ही विद्यार्थ्याच्या आईच्या बॅंक खात्यावर जमा केली जाते. जर आईचे बॅंक खाते नसेल तर वडिलांच्या बॅंक खात्यावर ती जमा केली जाते. मुख्याध्यापकांकडून संबधीत मयत विद्यार्थ्याच्या प्रस्ताव आल्यावर तो गटस्तरावरून जिल्हा स्तरावर येतो. आवश्यक प्रक्रिया पार पाडल्यानंतर तो प्रस्ताव शासनाकडे सादर केला जातो. पाठपुरावा करून त्याची रक्कम प्राप्त होते.
मृत्यूचे कारण संख्या
पाण्यात बुडून ०५
सर्प दंश ०४
अपघाती मृत्यू ०३
भिंत पडून ०२
अन्य कारणांमुळे ००
दीड वर्षात १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू १० सानुग्रह अनुदान मंजूर झालेली प्रकरणे
या योजनेसाठी एकच सर्वसमावेशक फॅार्म तयार करण्यात आला आहे. त्यासोबत एफआयआर, स्थळपंचनामा यांची प्रत, शवविच्छेदन अहवालाची प्रत आणि मृत्यू दाखला जोडावा लागतो. शिवाय रक्कम जमा होण्यासाठी आईच्या बॅंक पासबुकचीही झेरॅाक्स प्रत सोबत जोडावी लागते.
अपघात विमा योजनेअंर्तगत शाळा व गटस्तरावरून आलेली प्रकरणी लागलीच वरिष्ठ स्तरावर पाठविली जातात. यासाठी शिक्षण विभागाने सर्वसमावेशक अर्ज तयार केला असून त्यातच सर्व माहिती समाविष्ट केली जाते. वेळोवेळी पाठपुरावा करून लवकरात लवकर रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न असतो.
-डॅा.युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी.