तळोद्यात कार्य समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:31+5:302021-06-24T04:21:31+5:30
तळोदा : ओबीसींच्या आरक्षण बरोबरच मराठा समाजाचे आरक्षण केवळ राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. ...

तळोद्यात कार्य समितीची बैठक
तळोदा : ओबीसींच्या आरक्षण बरोबरच मराठा समाजाचे आरक्षण केवळ राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. याउलट आघाडीतील मंत्री ओबीसींची परिषद घेऊन दिशाभूल करीत असल्याची टीका भाजपाच्या नंदुरबार जिल्हा प्रभारी खासदार रक्षा खडसे यांनी केली. तळोदा येथील आदिवासी विकास भवनात बुधवारी कार्य समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खासदार डाॅ. हीना गावीत, आमदार राजेश पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, प्रदेश सदस्य राजेंद्र गावीत, नागेश पाडवी, संघटन मंत्री रवी अनासपुरे, सभापती यशवंत ठाकरे, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी उपस्थित होते.
राज्यातील आघाडी शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच आता ओबीसी समाजाचेही आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. हे दोन्ही आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी पक्षाने येत्या २६ जून रोजी तीव्र आंदोलन छेडले आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, राज्य सरकार आपली जबाबदारी केंद्रावर झटकून मोकले होत आहे. साहजिकच यामुळे समाजाचीही दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी रवी अनासपुरे, खासदार डॉ. हीना गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कल्पना पांड्या, सुनील चव्हाण, कपिल चौधरी, डॉ. स्वप्नील बैसाने, दारासिंग वसावे, प्रवीण गिरासे, राजेंद्र गावीत, नीलाबेन मेहता, भारती कलाल, कैलास चौधरी, प्रकाश वळवी, नारायण ठाकरे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कौशल पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रदीप शेंडे, जगदीश परदेशी, हेमलाल मगरे, भैय्या चौधरी, गोकुळ पवार यांनी परिश्रम घेतले.
व्यासपीठावर बसण्यावरून रुसवे, फुगवे
प्रमुख नेत्यांच्या बैठकीसाठी संयोजकांनी व्यासपीठ तयार केले होते. या व्यासपीठावर बसण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यास अडचण निर्माण झाली होती. आपल्याला जागा उपलब्ध करून दिली नाही म्हणून दोन पदाधिकारी यांनी तावातावाने कार्यक्रम सोडून बाहेर पडले होते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना समजूत काढताना संयोजकांना खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. शेवटी एकाची समजूत काढून त्यास व्यासपीठावर बसवून शांत केले. तर दुसरा कार्यक्रम सोडून माघारी परतलाच नाही. मात्र पदाधिकाऱ्यांच्या अशा रूसव्या, फुगव्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चा होती.