शहादा-मंदाणे राज्यमहामार्गाचे काम वेगाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:18 IST2021-03-29T04:18:02+5:302021-03-29T04:18:02+5:30

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांसाठी दुवा ठरणाऱ्या तळोदा ते आमलाड, ...

Work on Shahada-Mandane state highway is in full swing | शहादा-मंदाणे राज्यमहामार्गाचे काम वेगाने सुरू

शहादा-मंदाणे राज्यमहामार्गाचे काम वेगाने सुरू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांसाठी दुवा ठरणाऱ्या तळोदा ते आमलाड, बोरद, तऱ्हाडी, परिवर्धा, शहादा, मंदाणे, शहाणे, मालकातर, बोराडी सांगवी व पुढे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पुढे हातेड ते अमळनेर, पारोळा, भडगाव असा मोठ्या लांबीचा राज्यातील प्रथम क्रमांकाचा राज्यमार्गाचा दर्जा ठरलेल्या या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. केंद्र सरकारकडे खासदार डॉ.हीना गावीत यांनी पाठपुरावा करून एनईटी अंतर्गत या महामार्गाचे काम मंजूर करून घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या कामाचे नियंत्रण असून शहादा बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील कलमाडी ते वेळावदपासून शहादा, मंदाणे, शहाणा, मालकातरपर्यंत सुमारे ५५ किलोमीटर रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावर पूल व पाईपमोऱ्या नव्याने करण्यात येत आहेत. तसेच या मार्गावरील गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूला भुयारी गटारी करण्याचे काम सुरू आहे. डोंगरगाव व पिंपर्डे याठिकाणी काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. हा मार्ग मध्य प्रदेश राज्याला जोडणारा असून सारंगखेडाकडून व नंदुरबार, शहादाकडून मध्य प्रदेशात जाण्यासाठी सोयीचा तसेच वेळ व इंधन वाचवणारा ठरणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

वाहतूक वाढणार

हा राज्य मार्ग शहादा-मंदाणे व पुढे वडगाव-बोराडीकडे जात असला तरी मंदाणेमार्गे जावदा-भामरटानाकाकडे जाणारी वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मंदाणे-जावदा रस्त्याचे रुंदीकरण लवकर होणे आवश्यक आहे. गुजरात राज्याकडून तसेच दोंडाईचा, नंदुरबार, साक्रीकडून मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी हाच मार्ग सोयीचे ठरणार असल्याने आतापासूनच वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

विकासाला हातभार

शहादा-मंदाणे महामार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याने छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना वाढत्या वाहतुकीमुळे चांगला फायद्याचा ठरणार आहे. उपहारगृह, चहाची दुकाने, वाहन गॅरेज अन्य दुकाने थाटण्याचे नियोजन बेरोजगार तरुण करीत असल्याने मंदाणे भागातील विकासला चालना मिळणार आहे.

मंदाणे येथे पुलाचे नव्याने काम व्हावे

मंदाणे येथील नदीवरील मोठ्या पुलाच्या कामास तब्बल २५ वर्षे झाली असून या पुलावरील दोन्ही बाजूकडील लोखंडी सळ्या निघून गेल्या पूल कमकुवत बनत चालला आहे. आजूबाजूचे संरक्षक कठडे निघत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलावरून वाहतूक वाढल्यास हा पूल जास्त काळ टिकेल असे वाटत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. सध्या महामार्गाचे काम सुरू असून याठिकाणी नव्याने पूल बांधण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Work on Shahada-Mandane state highway is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.