रेल्वे बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:16+5:302021-06-29T04:21:16+5:30
नंदुरबार : शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे पालिकेकडील ८० लाख रुपये डिपाॅझिट रक्कम भरण्यात आले आहेत. आता पावसाळ्यानंतर हे ...

रेल्वे बोगद्याचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार
नंदुरबार : शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे पालिकेकडील ८० लाख रुपये डिपाॅझिट रक्कम भरण्यात आले आहेत. आता पावसाळ्यानंतर हे काम सुरू केले जाईल, असे पत्र पश्चिम रेल्वेचे मुख्य इंजिनिअर मुकेश कुमार यांनी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांना दिले आहे.
शहरातून गेलेल्या रेल्वेमार्गामुळे शहराचे दोन भागांत विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता, परंतु १३ वर्षांपूर्वी उड्डाणपूल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याच्या खालूनदेखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांनादेखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. सहा वर्षांपूर्वी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजूर करून घेतला होता. बोगदे बनवून तयार असतानाही ते बसविले जात नव्हते. एकूण २ कोटी ९६ लाखांपैकी पालिकेने आधी एक कोटी, नंतर ५० लाख व उर्वरित ८० लाख रुपये आरयूबी डिपॉझिट रक्कम भरली आहे. रेल्वेचे डीआरएम व वरिष्ठ अधिकारी आले असता नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी याबाबत त्यांना पत्र दिले होते. त्यानंतर लागलीच मुख्य अभियंता मुकेश कुमार यांनी पत्र पाठवून पावसाळ्यानंतर हे काम तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केेले आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दोन्ही बोगदे हे ठरलेल्या जागेत बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घेणे गरजेचे नसल्याचे संबंधितांनी सांगितले. यासाठी सुरुवातीला रेल्वे रुळाखालील भरावातून गेलेले केबल, ड्रेनेज लाइन, पाइपलाइन आदी हलविले जाणार आहे.
नवीन बोगदा झाल्यास दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ते सोयीचे ठरणार आहे. आधीच बोगदा ते थेट नळवा हद्दीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येऊन मध्ये दुभाजक व पथदिवे लावण्यात आले आहेत. दुसरा बोगदाही झाल्यास या रस्त्याच्या सौंदर्यकरणात वाढच होणार आहे.