खडकी आरोग्य केंद्राचे काम सदोष, विभागीय आयुक्तांच्या कारवाईच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:03+5:302021-06-25T04:22:03+5:30
गमे म्हणाले, अंगणवाडी केंद्रात पौष्टिक आहार देऊनही अतितीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून कारणांचा ...

खडकी आरोग्य केंद्राचे काम सदोष, विभागीय आयुक्तांच्या कारवाईच्या सूचना
गमे म्हणाले, अंगणवाडी केंद्रात पौष्टिक आहार देऊनही अतितीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी करून कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बाल उपचार केंद्र उपयुक्त ठरेल. तोरणमाळ येथील केंद्रात बालकासोबत पालक थांबण्यास तयार नसल्याने स्थानिक स्तरावर उपचार करणे सोयीचे ठरेल आणि बालकांच्या प्रकृतीचीही चांगली काळजी घेतली जाईल, तसेच आवश्यकतेनुसार उपचारात बदल करता येईल.
आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात त्रुटी असल्याने त्रयस्थ यंत्रणेमार्फत बांधकामाची चौकशी करण्यात यावी. बांधकामात आवश्यक दुरुस्ती करून आरोग्य केंद्रातील कामकाज लवकर सुरू करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
खडकी परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कालांतराने तोरणमाळ येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल होणार असल्याने परिसरातील खासगी निवासातील अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत स्थंलातरित करण्याबाबत आतापासून नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी दिल्या.
गमे यांनी आरोग्य केंद्र परिसरात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाची माहिती घेतली. जनजागृतीसाठी शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी चांगले प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाविषयी माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
झापी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीस भेट दिली. तेथील सुविधेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. परमानंद रावळे हे दुर्गम भागात सेवा देत असल्याने त्यांचे कौतुकही केले. आरोग्य केंद्रातील सुविधाबाबत परिसरातील नागरिकांना माहिती द्यावी आणि या सुविधेचा उपयोग त्यांनी करावा यासाठी त्यांचे समुपदेशन करावे, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.