लाकडी अवजारे होत आहेत शेतीकामातून हद्दपार, काळ्या मातीत चालणारी तिफनही नजरेआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST2021-06-03T04:22:12+5:302021-06-03T04:22:12+5:30
कळंबू : अलीकडच्या काळात विविध प्रकारचे तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले व मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञाननिर्मित वस्तूंचा वापर ही ...

लाकडी अवजारे होत आहेत शेतीकामातून हद्दपार, काळ्या मातीत चालणारी तिफनही नजरेआड
कळंबू : अलीकडच्या काळात विविध प्रकारचे तंत्रज्ञान वेगाने विकसित झाले व मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञाननिर्मित वस्तूंचा वापर ही वाढला आहे. शेती आणी शेतकरी ही याला अपवाद नाही. आधी बैलजोडी व लाकडी अवजारे यांच्या साहाय्याने शेती करणारा शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती न करता आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. त्यात ट्रॅक्टर तसेच शेती कामासाठी लागणारी लोखंडी अवजारे बाजारात उपलब्ध होत असून, या अवजारांचा मोठ्या प्रमाणात शेतीत वापर होऊ लागला आहे. परिणामी आधी शेतीत सर्वत्र वापरात येणारे लाकडी अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलजोडीच्या साहाय्याने नागंरटी करणे, वखरणी करणे, हे केव्हाच इतिहास जमा झाले आहे.
अलीकडच्या काही वर्षांपासून लाकडी वखर, नागर, तिफन, कोळपे, दुसा, आदी शेती उपयोगी अवजारे काळ्या मातीतून काढता पाय घेऊ लागली आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडत चालली आहे.
शेतीकामासाठी लागणारी सगळीच लाकडी अवजारे आता दिसेनासी होऊ लागली आहेत. लाकडी अवजारांची वाढती किंमत, मजुरी व दुरुस्ती खर्च अवाक्याबाहेर जात आहे. शिवाय या अवजारांकडे दुर्लक्ष झाले अथवा मातीच्या संपर्कामुळे त्यांना उधई लागते. त्यामुळे तुलनेने वापरायला सोईची असणाऱ्या लोखंडी अवजारांनी शेतीमध्ये चांगलाच जम बसविल्याचे चित्र सद्या कळंबूसह परिसरात पहायला मिळत आहे.
काळ्या मातीत पेरणीच्या वेळी चालणारी लाकडी तिफन आता नजरेआड होऊन फक्त कवितेतच पाहायला मिळत आहे. बैलजोडीच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर पोचल्याने शेतीच्या मशागतीसह पेरणीच्या कामात ही हल्ली ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसेच शेतीच्या मदतीला आधुनिक यंत्रे आल्यामुळे वेळेची बचत होत आहेत.