महिलांनी महिलांसाठी चालविलेले महिला कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST2021-05-05T04:49:30+5:302021-05-05T04:49:30+5:30
नंदुरबार : महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या महिला कोविड सेंटरचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक महिलांनी येथे उपचार घेतला ...

महिलांनी महिलांसाठी चालविलेले महिला कोविड सेंटर
नंदुरबार : महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या महिला कोविड सेंटरचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक महिलांनी येथे उपचार घेतला असून सध्या २५ पेक्षा अधिक महिला येथे दाखल आहेत. सर्व प्रकारच्या सुविधा आणि सुरक्षितता याला येथे प्राधान्य देण्यात आले आहे. खान्देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. नंदुरबार नगर पालिका त्याचे संचलन करीत आहे.
कोरोना काळात उपचार घेणाऱ्या महिलांचा, विलगीकरण कक्षातील महिलांचा विनयभंग झाल्याची घटना राज्यात अनेक ठिकाणी घडली आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात देखील गेल्या वर्षी एका युवतीबाबत विनयभंगाची घटना घडली होती. त्यामुळे यावर्षी अर्थात दुसऱ्या लाटेमध्ये महिलांच्या सुरक्षिततेला जिल्ह्यात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालय असो किंवा कोविड केअर सेंटर असो, प्रत्येक ठिकाणी त्याची काळजी घेतली जात आहे. त्याच अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी नंदुरबारात महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या महिला कोविड सेंटरची संकल्पना मांडून ती तडीस नेली आहे.
अत्याधुनिक इमारत
नंदुरबारातील होळ शिवारात असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात हे सेंटर चालविण्यात येत आहे. नवीनच इमारत असल्यामुळे येथे आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत. इमारतीच्या आजूबाजूला सुरक्षेेच्या दृष्टीने कुंपण आहे. आतमध्ये हॅाल असून खोल्या आहेत. प्रत्येकी खोलीत दोन ते चार बेड ठेवण्यात आले आहेत. स्नानगृह, स्वच्छतागृह सुस्थितीत आहेत. इमारतीचा टेरेस ऐसपैस असून सायंकाळी किंवा सकाळी त्या ठिकाणी जाण्याची परवानगी आहे. नैसर्गिक वातावरणात ही इमारत असल्यामुळे येथील वातावरण आल्हाददायक राहत असते.
स्टाफही महिलाच
या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला स्टाफही महिलाच आहेत. तीन डॅाक्टर, सहा नर्सेस यांच्यासह स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचारी महिला आहेत. येथे दाखल महिलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. दोन वेळचे जेवण, एक वेळ नाश्ता व चहा दिला जातो. गार पाण्याचे जार पुरविले जात आहेत. वेळोवेळी स्वच्छता करून सॅनिटाइझदेखील केले जात असते. त्याची जबाबदारी नगरपालिकेची असून पालिका प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवले जाते. येथील व्यवस्थापन अधिकारी म्हणून चेतन सोनजे हे काम पाहत आहेत.
इतर आवश्यक सुविधाही
महिलांसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व सुविधा या ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अगदी घरातील वातावरणाप्रमाणे येथील कोविड सेंटरचे वातावरण तयार करण्यात यश आले आहे. येथून बऱ्या होऊन गेलेल्या महिलांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.