लाकूड घेतल्याने महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:50 IST2019-12-18T11:50:39+5:302019-12-18T11:50:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तलाईचा मालपाडा येथील महिलेचा लाकूड घेतल्याच्या वादातून एकाने खून केल्याची घटना १४ ...

लाकूड घेतल्याने महिलेचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील तलाईचा मालपाडा येथील महिलेचा लाकूड घेतल्याच्या वादातून एकाने खून केल्याची घटना १४ डिसेंबर रोजी घडली होती़ याप्रकरणी १६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला़
संगीता किशन पाडवी (३०) असे मयत महिलेचे नाव असून त्या तलाईचा मालपाडा येथील रहिवासी होत्या़ १४ डिसेंबर रोजी संगीता पाडवी ह्या असली गावच्या डोंगरालगत सत्या दवल्या वसावे याच्या शेतात लाकडे तोडण्यासाठी गेल्या होत्या़ याठिकाणी त्या शेतातून लाकडे गोळा करत असताना सत्या वसावे याने येऊन वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ यातून घाबरलेल्या संगीताबाई ह्या घराकडे परतत होत्या़ परंतू लाकूड तोडल्याचा राग मनात धरत सत्या वसावे याने महिलेचा पाठलाग करत असली गावाच्या गुहार डोंगराच्या उतारावर गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली होती़ यादरम्याने त्याने संगीताबाई यांच्या डोक्यात थेट दगड घातला होता़ यातून त्यांच्या डोळ्यासह डोक्यात गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला होता़ यातून जखमी संगीताबाई यांचा मृत्यू झाला होता़ घटनेची वाच्यता होऊ नये यासाठी संशयित सत्या वसावे याने दगड फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता़ या प्रकारानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता़ मयत महिलेच्या महिलेच्या पतीसह कुटूंबियांनी तिचा शोध सुरु केल्यानंतर ती मयतावस्थेत आढळून आली होती़
याबाबत सोमवारी किसन पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित सत्या वसावे याच्याविरोधात धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तातडीने अटक करण्यात आली़