ओबीसींच्या आरक्षणाच्या निर्णयाशिवाय जि.प. पोटनिवडणुका घेऊ नये- खासदार रक्षा खडसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:30+5:302021-06-24T04:21:30+5:30
भाजपतर्फे २६ रोजी जिल्ह्यात होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी खासदार रक्षा खडसे नंदुरबारात आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार ...

ओबीसींच्या आरक्षणाच्या निर्णयाशिवाय जि.प. पोटनिवडणुका घेऊ नये- खासदार रक्षा खडसे
भाजपतर्फे २६ रोजी जिल्ह्यात होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी खासदार रक्षा खडसे नंदुरबारात आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी सांगितले, राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यात आणखी समस्या निर्माण झाली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित राहावे, ही आमची मागणी कायम आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून केली आहे. असे असतानाही धुळे, नंदुरबारसह राज्यातील चार जिल्ह्यात जि.प.,पं.स.च्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका स्थगित करण्यात याव्या, अशी भाजपची मागणी आहे. यासाठी निवडणूक आयोग व राज्य शासनाकडे मागणी करणार असल्याचेही खासदार खडसे यांनी स्पष्ट केले.
ओबीसी आरक्षणाच्या लढ्यासाठीच भाजपतर्फे जिल्ह्यात २६ जून रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले असल्याचीही माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.
पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, खासदार डॉ. हीना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हा संघटन सचिव नीलेश माळी आदी उपस्थित होते.