नवापुरात वॉइन शॉप सर्रास सुरू, भरत गावित यांनी उघडकीस आणला प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:21+5:302021-05-15T04:29:21+5:30
नंदुरबार : नवापूर शहरातील भर वस्तीतील वॉइन शॉप सुरू असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी उघडकीस ...

नवापुरात वॉइन शॉप सर्रास सुरू, भरत गावित यांनी उघडकीस आणला प्रकार
नंदुरबार : नवापूर शहरातील भर वस्तीतील वॉइन शॉप सुरू असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी उघडकीस आणला. केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच प्रशासनाचे नियम लागू का, दारू विक्रेत्यांना त्यातून सूट दिली आहे का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, या सर्व घटनेचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरलदेखील केला आहे.
सध्या संचारबंदी लागू आहे. दारू दुकानांना केवळ होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. असे असतानादेखील नवापूर शहरातील एक वॉइन शॉप शुक्रवारी दुपारी सव्वावाजेपर्यंत उघडे होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य भरत गावित यांनी थेट या दुकानावर जाऊन व्हिडिओ तयार करीत प्रशासनाला जाब विचारला. संचारबंदीचे नियम केवळ सर्वसामान्य नागरिकांनाच आहे का, शटर उघडे करून सर्रास दारू विक्री करण्याची परवानगी या विक्रेत्याला कुणी दिली, प्रशासन यावर काय कारवाई करणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यांच्या व्हिडिओमध्ये ग्राहक पार्सल घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने चर्चा होती. आता या दुकानावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.