ऑक्सिजन प्रकल्पासाठी प्रोत्साहन देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST2021-06-11T04:21:29+5:302021-06-11T04:21:29+5:30
जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता जिल्हा रुग्णालयासह शहादा, तळोदा व नवापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रकल्प कार्यान्वित आहेत, तर काही ...

ऑक्सिजन प्रकल्पासाठी प्रोत्साहन देणार
जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता जिल्हा रुग्णालयासह शहादा, तळोदा व नवापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रकल्प कार्यान्वित आहेत, तर काही ठिकाणी सुरू होत आहेत. आता खासगी उद्योजकांनादेखील असे प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यातील पात्र उद्योजकांनी ३० जूनपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार यांनी केले आहे.
‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजनेअंतर्गत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पात्र ऑक्सिजन निर्मिती उद्योगांना गुंतवणुकीच्या कमाल १५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानामध्ये राज्य वस्तू व सेवाकराचा १०० टक्के परतावा, पाच टक्के व्याज अनुदान, पहिल्या पाच वर्षांसाठी दोन रुपये प्रतियुनिट वीज अनुदान, विद्युत शुल्क माफी व मुद्रांक शुल्क माफी या अनुदानांचा समावेश आहे.
२५ मेट्रिक टनपेक्षा जास्त उत्पादन क्षमतेच्या उद्योगांना स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या २० टक्के किंवा कमाल १५ कोटी रुपये एवढे भांडवली अनुदान समान पाच हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रामध्ये स्थापित होणाऱ्या घटकांना प्राधान्याने भूखंड वाटप करताना प्रचलित दरामध्ये ५० टक्के सूट देण्यात येईल.
एमएसएमई प्रवर्गातील ५० कोटी रुपयांपर्यंत स्थिर भांडवली गुंतवणूक असलेले प्रकल्प ३१ मार्चपर्यंत उत्पादनात जाणे आवश्यक आहे. भांडवली अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २५ मेट्रिक टनावरील उद्योगांनी ३१ डिसेंबरपूर्वी व ५० मेट्रिक टनवरील उद्योगांनी ३० जूनपर्यंत उत्पादनात जाणे आवश्यक राहील. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.