पोलीस आणि ग्रामीण लोकांमधील अंतर कमी करण्यास प्राधान्य देणार; पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:51+5:302021-09-02T05:05:51+5:30
तळोदा : मुलींची छेड काढणाऱ्या व टिंगल टवाळी करणाऱ्या रोडरोमीयोंचा बंदोबस्ता बरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिसांचा अकारण जो धाक ...

पोलीस आणि ग्रामीण लोकांमधील अंतर कमी करण्यास प्राधान्य देणार; पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा
तळोदा : मुलींची छेड काढणाऱ्या व टिंगल टवाळी करणाऱ्या रोडरोमीयोंचा बंदोबस्ता बरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिसांचा अकारण जो धाक आहे. तो कमी करून पोलीस आणि ग्रामीण लोकांमधील अंतर कमी करण्यावर अधिक प्राधान्य देणार असल्याचे तळोदा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांची नुकतीच मुख्यालयात बदली करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून केलसींग पावरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पावरा यांनी नुकताच आपला पदभार देखील हाती घेतला आहे. तळोदावासियांनी त्यांचे जोरदार स्वागतदेखील केले आहे. येथील पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील लोकांमध्ये पोलिसांबद्दल अकारण भीती वाटत असते. त्यामुळे त्यांच्यात पोलीस खात्याबाबत भीती वाटते. हि भीती कमी करून पोलिसांबद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यावर भर देणार आहे. शहरात बुलेटचा सायलेन्सरचा आवाजाने ध्वनी प्रदूषण व नागरिकांना त्या आवाजाचा त्रास होतो असे सायलेन्सर तातडीने काढण्याविषयी वाहन चालकांना सूचना दिल्या जातील. या शिवाय मुलींची टिंगल टवाळी करणाऱ्या रोड रोमीयोंचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची सेवा आतापर्यंत मुंबई, नासिक,जळगाव, धुळे येथे झाली आहे. प्रवास सुरूवातीला शिक्षकनंतर पोलीस असा राहिला आहे.
सात महिन्यात तीन पोलीस निरीक्षक
तळोदा पोलीस ठाण्यात गेल्या सात महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती पोलीस प्रशासनाने केली आहे. साहजिकच नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाची तळोदावासियांना मोठी उत्सुकता लागून आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक नंदराज पाटील यांनी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारला होता. जेमतेम चारच महिने ते राहिलेत. त्यानंतर पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांनी चार्ज घेतला होता. तेही चार-साडे चार महिनेच टिकले. त्यामुळे नवनियुक्त पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांचाही कार्य पध्दती बाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.