महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:20+5:302021-09-05T04:34:20+5:30

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात ...

Will Mahatma Gandhi Dispute Free Village Campaign be re-implemented in villages? | महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का?

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का?

तोरखेडा : गावात तंटे होऊ नये, दाखल असलेले तंटे व नव्याने निर्माण होणारे तंटे गावातच मिटवले जावेत तसेच गावात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होऊन गावाची वाटचाल समृद्धीकडे व्हावी या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी १५ ऑगस्ट २००७ला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव या मोहिमेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे बरेच गावे तंटामुक्त होऊन विकासाच्या मार्गाने वाटचाल करीत होते. परंतु मागील काही वर्षापासून गावपातळीवरील महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने ग्रामीण भागात भांडण तंटे दिवसेंदिवस वाढीस लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गृहविभागाने पुन्हा महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुरू करून गावपातळीवरील तंटे गावात मिटविण्यात सुयश येईल, असे ग्रामीण भागातील ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावात तंटामुक्त गाव समितीची स्थापना करून त्या समितीच्या माध्यमातून गावात सामाजिक उपक्रम, गावातील लहान-मोठे तंटे, एकमेकांत असलेले वाद, शेतीचे वाद गाव पातळीवर समितीच्या माध्यमातून सोडविले जात होते. त्यामुळे गावातील तक्रारीचे निवारण गावातच होत असल्यामुळे गावातील तंटे पोलीस ठाण्यातपर्यंत जात नव्हते. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात शांतता व एकोपा दिसून येत होता. समितीच्या माध्यमातून गावात दारूबंदी करून दारू हद्दपार केली. गावातील छोटे-मोठे भांडण गावात मिटवले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम थंडावल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गावागावात पुन्हा राबविण्यात येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम

समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात मिटवले जात होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार जात नसल्याने पोलीस प्रशासनावरील कामाचा भार थोड्याफार प्रमाणात कमी झाला होता. तसेच गावातील वातावरण आनंदित राहत होते. शासन स्तरावरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा राबविण्यात यावी, अशी माझी मागणी आहे. - डॉ. योगेश चौधरी, पोलीसपाटील, बामखेडा

महात्मा गांधी तंटामुक्त गाव

समितीच्या माध्यमातून गावातील छोटे-मोठे तंटे गावात मिटवले जातात. गावात दारूबंदी केली जात होती. या माध्यमातून अनेकांनी दारू सोडली. समाजोपयोगी उपक्रम राबविले जात होते. त्यामुळे गावात एकोपा तयार होत होता. त्यामुळे शासनाने थंडावलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करावी.

-राजबद्दूर शिंदे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, तोरखेडा

तंटामुक्त गाव समितीची फेरनिवड व्हावी. आठ वर्षांपासून जैसे थे समित्या आहेत.

संबंधित विभागाकडून जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न हवेत

Web Title: Will Mahatma Gandhi Dispute Free Village Campaign be re-implemented in villages?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.