यंदाच्या गणेशोत्सवासाठीही बाप्पांची मूर्ती लहानच राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:22 IST2021-05-31T04:22:40+5:302021-05-31T04:22:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उत्सवांमधील सर्वांत मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवातील बाप्पांच्या मूर्ती यंदाही लहानच अर्थात चार ...

Will the idol of Bappa remain small even for this year's Ganeshotsav? | यंदाच्या गणेशोत्सवासाठीही बाप्पांची मूर्ती लहानच राहणार?

यंदाच्या गणेशोत्सवासाठीही बाप्पांची मूर्ती लहानच राहणार?

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : उत्सवांमधील सर्वांत मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवातील बाप्पांच्या मूर्ती यंदाही लहानच अर्थात चार फुटांपर्यंतच राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचा सुरू असलेला कहर, तिसऱ्या लाटेची व्यक्त करण्यात येणारी भीती यांमुळे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या मूर्ती तयार करण्यास नंदुरबारातील मूर्ती कारागीर धजावत नसल्याची स्थिती आहे. येथील मूर्ती कारखान्यांमधील लगबग उत्सवाच्या सहा महिने आधीपासून सुरू होते. यंदा मात्र अद्यापही शांतताच असल्याचे चित्र आहे.

नंदुरबारचा गणेशोत्सव आणि येथील मूर्तिकला राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथील ३० पेक्षा अधिक मूर्ती कारखान्यांमधून पाच ते २० फुटांच्या पाच हजारांपेक्षा अधिक मूर्ती तयार होतात. येथील मूर्तिकला पेणच्या मूर्तिकलेच्या तोडीची आहे. राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश येथील शेकडो गणेश मंडळे येथून मूर्ती नेत असतात. शिवाय यूएई, दक्षिण आफ्रिका येथेही यापूर्वी नंदुरबारच्या गणेशमूर्ती गेलेल्या आहेत. अशा या मूर्तिकलेला गेल्या वर्षापासून कोरोनामुळे फटका बसला आहे. अवघ्या चार फूट उंचीच्या गणेशमूर्तींच्या शासनमर्यादेमुळे हा व्यवसाय गेल्या वर्षापासून ठप्प पडला आहे.

दोन हजार मूर्ती पडून

गेल्या वर्षी शासनाने अवघ्या चार फूट उंचीच्या मूर्तीचा शासन आदेश ऐनवेळी काढला होता. शिवाय सार्वजनिक उत्सवावरही मर्यादा आणल्या होत्या. त्यामुळे नंदुरबारातील कारखान्यांमध्ये पाच ते २० फूट उंचीच्या दोन हजारांपेक्षा अधिक मूर्ती बनवून तशाच ठेवाव्या लागल्या होत्या. अनेक मंडळांनी तीन महिने आधी मूर्ती बुकिंग करून ठेवलेल्या होत्या; त्यांनाही पैसे परत करावे लागले होते. त्यामुळे मूर्ती कारागिरांना लाखोंचा फटका बसला होता. बँक, खासगी व्यक्ती यांच्याकडून काढलेल्या कर्जाचा बोजा अजूनही त्यांच्यावर कायम आहे.

यंदा जर गणेशोत्सवावरील मर्यादा शिथिल केल्या गेल्या तर गेल्या वर्षापासून तयार असलेल्या जवळपास दोन हजार मूर्ती विक्री करता येणार आहेत.

कारखान्यांमध्ये शांतता

नंदुरबारातील मूर्ती कारखाने मार्च महिन्यापासून सुरू होतात. त्यातून शेकडो जणांना रोजगार मिळतो. यंदा मात्र अजूनही कारखान्यांमध्ये शांतता आहे. कारागीर केवळ चार फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती तयार करीत आहेत. घरगुती उत्सवासाठी असलेल्या या मूर्तींसाठी स्वत: कारागीरच मेहनत घेत आहेत. त्यामुळे मजुरांना कारखान्यांमध्ये रोजगार नसल्याचे चित्र आहे.

लाखोंची उलाढाल ठप्प होणार?

गणेशमूर्ती खरेदी-विक्रीतून शहरात लाखोंची उलाढाल होते. अनेकांना रोजगार मिळतो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ही उलाढाल ठप्प राहते की काय? याबाबत चिंता आहे. बाप्पांच्या कृपेने कोरोनाचा कहर कमी झाल्यास उत्सव साजरा करण्यास मोकळीक राहील, अशी अपेक्षा मूर्ती कारागीर व्यक्त करीत आहेत.

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाचे काय आदेश असतील याबाबत संभ्रम आहे. शिवाय गेल्यावर्षी तयार करून ठेवलेल्या ५ ते २० फूट उंचीच्या मूर्ती कारखान्यात आहेत. त्यामुळे मूर्तिकार यंदा मोठ्या मूर्ती तयार करीत नाहीत. घरगुती उत्सवासाठी चार फूट उंचीच्या मूर्तीच सध्या कारखान्यांमध्ये तयार केल्या जात आहेत. बाप्पांच्या कृपेने सर्व काही ठीक झाले तर मूर्ती कारागिरांनाही पूर्वीचे वैभव प्राप्त होईल.

-दिलीप चौधरी, मूर्ती कारागीर, नंदुरबार

Web Title: Will the idol of Bappa remain small even for this year's Ganeshotsav?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.