होस्टेलच्या इमारती अधिग्रहीत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:16 IST2020-03-19T12:15:56+5:302020-03-19T12:16:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी काळात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २०० बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी ...

होस्टेलच्या इमारती अधिग्रहीत करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आगामी काळात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २०० बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी वसतिगृहे आणि आश्रम शाळांच्या इमारती अधिग्रहीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून ठेवाव्या. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिल्या. दरम्यान, सद्य स्थितीत शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील ९३ बेड विलगीकरणासाठी आरक्षीत ठेवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी नंदुरबार वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी अविशांत पंडा, निवासी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.के.डी.सातपुते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ आणि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय प्रशासन यांच्याकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस या आजाराची लागण झाली नसून तशी परिस्थिती उद्भवल्यास परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व यंत्रणानी सज्ज राहावे. जिल्ह्यात सर्व शासकीय रुग्णालये व खाजगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता कक्ष आरक्षित करण्यात आले आहे.
९३ बेड आरक्षीत
शासकीय रुग्णालयात ३९ आणि खाजगी रुग्णालयातील ५४ असे एकूण ९३ बेड संशयित रुग्णांच्या विलगिकरणासाठी आरक्षित आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान २०० बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. यासाठी आदिवासी आश्रमशाळातील वसतीगृह तसेच समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील जागेचा वापर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी दिल्या.
नंदुरबार बसस्थानकात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नंदुरबार आगाराने नियमितपणे बसेसची स्वच्छता करावी. कर्मचाऱ्यांसाठी सॅनेटायझरचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी विशेषत: रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ सर्व पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, ट्रॅव्हल पॉईट येथे ‘काय करावे काय करु नये’ याबाबत जनजागृतीपर फलक लावावे.
ग्रामिण स्तरावर एक पथक
अत्यावश्यक सेवेसाठी बाहेरुन येणारे संशयीत रुग्णाची माहिती व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामीण स्तरावर एक पथक नेमण्यात यावे. त्यासाठी त्या व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी नोंदवही ठेवावी.
आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश न पाळणाºया व्यवसायिकांविरोधात कारवाई करावी. दुर्गम भागात खाजगी प्रवासी वाहतुकदारांनी वाहनात जास्त प्रवासी संख्या बसवू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जंतूनाशक फवारणी करावी
नगरपालिका तसेच नगरपरिषदांनी रेल्वेस्टेशन, बस स्थानके, शहरी तसेच ग्रामीण रुग्णालये, शासकीय कार्यालय, न्यायालय, रुग्णालय, तसेच मुख्य बाजारपेठात जंतूनाशक फवारणी करण्याच्या सूचनाही डॉ.भारुड यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयांना पुढील लग्नकार्याची बुकींग न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे नागरीकांनी पालन केल्यास कोरोनावर निश्चित मात करु, असा विश्वास यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील खाटांची संख्या ३२ वर नेण्यात आली आहे. आतापर्यंत विलगीकरण कक्षात एकाही रुग्ण दाखल झालेला नाही. निवासी वैद्यकीय अधिकारी के.डी.सातपुते यांच्याकडे या कक्षाच्या देखरेखची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेषतज्ज्ञांमध्ये डॉ.नरेश पाटील, डॉ.राजेंद्र चौधरी, डॉ.कपील दुसेज, डॉ.मंगलसिंग पावरा, डॉ.किरण जगदेव यांच्यासह सहा परिचारिका, तीन शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी या कक्षाची पहाणी केली.
जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षाशिवाय इतर कक्षांमध्ये देखील विशेष दक्षता घेतली जात आहे. नियमित स्वच्छतेवर भर दिला जात आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी कमी व्हावी यासाठी सुचना दिल्या जात असल्याचे डॉ.रघुनाथ भोये यांनी सांगितले.