काट्यांमध्ये व्यायाम करायचा का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST2021-05-28T04:22:57+5:302021-05-28T04:22:57+5:30

कोठार : तळोदा येथील तापी माँ नगरच्या परिसरात क्रीडा विभागाकडून बसवण्यात आलेले ओपन जिमचे साहित्य काटेरी ...

Why exercise in thorns | काट्यांमध्ये व्यायाम करायचा का

काट्यांमध्ये व्यायाम करायचा का

कोठार : तळोदा येथील तापी माँ नगरच्या परिसरात क्रीडा विभागाकडून बसवण्यात आलेले ओपन जिमचे साहित्य काटेरी झाडाझुडपांमध्ये बसवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे काट्यांमध्ये व्यायाम करायचा का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

आदिवासी उपयोजने अंतर्गत तळोदा नगर पालिकेच्या वतीने क्रीडा विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी ओपन जिमचे साहित्य बसवण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत आठ ठिकाणी हे साहित्य बसवण्यात आले आहे. नागरिकांना सदृढ आरोग्यासाठी आरोग्यदायी सवयी लागाव्यात व सकाळ-संध्याकाळी चालता-फिरता नागरिकांना सहजपणे व्यायामासाठी साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी ओपन जिमचे प्रस्ताव नगर पालिकेने क्रीडा विभागाकडे २०१९-२०२० वर्षी पाठवले होते.

शहरात विविध आठ ठिकाणी अशा पद्धतीच्या ओपन जिम बसवण्यात येत आहेत. मात्र तळोदा शहरातील तापी माँ नगरच्या परिसरात बसवण्यात आलेले ओपन जिमचे साहित्य हे काटेरी झाडाझुडपांमध्ये बसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या ठिकाणी बसवण्यात आलेल्या ओपन जिमच्या साहित्याजवळ बाभळीची मोठी काटेरी झाडे आहेत. जमिनीचा भागदेखील असमतोल व ओबडधोबड स्वरूपाचा आहे. याठिकाणी बसविण्यात आलेल्या साहित्यापर्यंत सहजपणे कुणी पोहचू शकणार नाही अशी स्थिती आहे. तेथपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्तादेखील नाही. जरी कुणी काटेरी झाडेझुडपांचा सामना करत साहित्यापर्यंत व्यायाम करण्यासाठी पोहचला तरी तेथे व्यायाम करता यावे यासाठी आवश्यक प्रसन्न वातावरणदेखील नसून काटेरी झाडांमुळे व्यायाम करणे शक्य नाही.

दरम्यान, या शहरात अनेक ठिकाणी बसवण्यात आलेल्या साहित्यापर्यंत नागरिकांना सहजपणे पोहचता येईल व त्यांना त्याचा वापर करता येईल, अशा रहिवासी भागात साहित्य बसविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र याठिकाणी बसविण्यात आलेल्या साहित्याचा परिसरात, जवळपास इतर ठिकाणासारखी स्थिती नाही. ज्याठिकाणी हे साहित्य बसविण्यात आले आहे, त्याठिकाणी जवळपासच्या परिसरात कचरादेखील विखुरलेल्या स्वरूपात दिसून येतो. अनेक नागरिकांकडून त्यांच्या रहिवासी भागात, ओपन स्पेसमध्ये हे साहित्य बसवावे, अशी मागणी आहे. तसेच तापी माँ परिसरात काटेरी झाडेझुडपांमध्ये साहित्य बसविण्यासाठी जागेची निवड कुणी केली? याचादेखील शोध घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली असल्याचे समजते. ओपन जिमचे साहित्य शहरात बसविण्याची प्रक्रिया क्रीडा विभागाकडून राबविण्यात आली आहे. तापी माँ परिसरात बसविण्यात आलेले साहित्य हे क्रीडा विभागाचे कर्मचारी व संबंधित ठेकेदार हे पालिकेला अनभिज्ञ ठेवून परस्पर बसवून गेले असल्याचे नगराध्यक्ष परदेशी यांनी सांगितले.

शिवसेनेची आक्रमक भूमिका

तापी माँ परिसरात काटेरी झाडा-झुडपांमध्ये बसविण्यात आलेल्या ओपन जिमच्या प्रकारावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

एका ओपन प्लेसच्या ठिकाणी जिथे कोणत्याही ओपन प्लेसला पक्के वाॅल कंपाउंड नाही किंवा सिमेंटचे तारयुक्त असे कंपाउंड नाही, लोक जिथे पाय ठेवू शकत नाही अश्या ठिकाणी हे साहित्य बसवून साहित्यासाठी लागलेल्या पैशांचा अपव्यय करताना दिसत आहे. ज्या तापी माँ नगरमध्ये हे ओपन जिम बसविले जात आहे त्या ठिकाणी कोणतीही सुविधा नसताना कुणाच्या मेहेरबानीमुळे या ठिकाणी साहित्य बसविण्यात आले? असा प्रश्न शिवसेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र दुबे यांनी उपस्थित केला आहे. लवकरात लवकर जर हे साहित्य योग्य ठिकाणी बसवावे, अन्यथा शिवसेना ते सर्व साहित्य उखडून योग्य ठिकाणी लावेल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.

तापी माँ परिसरात क्रीडा विभागाकडून साहित्य बसविण्यात आले असताना पालिकेला कळविण्यात आले नाही. या प्रकाराबाबत क्रीडा विभागाला कळविण्यात आले आहे. अद्याप क्रीडा विभाग व संबंधित ठेकेदाराला पालिकेकडून ताबा पावती देण्यात आलेली नाही. नागरिकांना गैरसोय होणार नाही या दृष्टीने सोय करण्यात येईल. -अजय परदेशी, नगराध्यक्ष, तळोदा

या ठिकाणी बसवण्यात आलेले साहित्य हे नागरिकांसाठी झाडेझुडपे काढल्याशिवाय व परिसराची स्वच्छता केल्याशिवाय उपयोगात येणार नाही असे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरातील काटेरी झुडपे काढण्यात यावी व परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Why exercise in thorns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.