कुणी मतदान करणार का.. मतदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 17:58 IST2017-09-29T17:58:35+5:302017-09-29T17:58:35+5:30

अक्कलकुवा ग्रामपंचायत : प्रभाग चारमध्ये उमेदवार सहा, मतदार मात्र शून्य

Who will vote for voting? | कुणी मतदान करणार का.. मतदान !

कुणी मतदान करणार का.. मतदान !

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘या तुफानाला कुणी घर देता का,  घर..’ नटसम्राट या नाटकामधील आप्पा बेलवणकर यांच्या अवस्थेसारखीच काहीशी अवस्था अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील प्रभाग चारमधील उमेदवारांची झाली आहे. या प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात सहा उमेदवार असले तरी प्रत्यक्षात मात्र येथे एकही मतदार नसल्याने मतदान मागावे कुणाकडे असा प्रश्न या उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हे तालुक्याचे मुख्यालय. याठिकाणी शासनाने नगरपंचायत स्थापन करण्याचा निर्णय दीड वर्षापूर्वी घेतला होता. मात्र त्याबाबत नागरिकांनी हरकती घेतल्याने नगरपंचायत स्थापनेचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याठिकाणी सध्या पूर्वीचीच ग्रामपंचायत गृहीत धरून निवडणूक जाहीर केली आहे.
अक्कलकुवा या शहराची लोकसंख्या तशी 24 हजाराच्यावर आहे. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना प्रशासनाने नियमानुसार व लोकसंख्येचा निकष गृहीत धरून प्रभाग जाहीर केले. याठिकाणी एकूण सहा प्रभाग आहेत. परंतु प्रत्यक्षात मात्र मतदार नऊ हजार 732 आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग जाहीर झाले असले तरी प्रभाग चारमध्ये एकही मतदाराची नोंदणी झालेली नाही. हा भाग तसा जामिया महाविद्यालयाच्या परिसराचा आहे. याठिकाणी विद्यार्थी मोठय़ा संख्येने वास्तव्यास आहेत. जनगणनेत त्यांची नोंदणी झाली असली तरी मतदानासाठी मात्र तेथील विद्याथ्र्यानी व कर्मचा:यांनी आपापल्या मूळगावी नाव नोंदणी केल्याने या प्रभागात एकही मतदाराची नोंदणी नाही.
एकीकडे या प्रभागात मतदार नसले तरी निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रभाग चारसाठीही उमेदवारी अर्ज भरण्यात आले. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन होती. या प्रभागातून सहा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. माघारीच्या मुदतीनंतरही हे सहाही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या 7 ऑक्टोबरला तेथे मतदान होणार आहे. गावात सर्वत्र निवडणुकीसाठी प्रचार सुरू असला तरी प्रभाग चारमधील उमेदवारांना मतदान मागण्यासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न पडला आहे.
संपूर्ण गावालाही या प्रभागातील मतदानाचे काय होईल याबाबत उत्सुकता लागली आहे. दरम्यान, प्रशासनाने यासंदर्भात निवडणूक आयोगाला कळवले असून या प्रभागातील मतदानाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. आता सर्वाचे लक्ष निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लागून आहे.

आमच्या प्रभागात एकही मतदार नसल्याने मतदान मागण्यासाठी कुणाकडे जावे असा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडे जाब विचारला असता त्याबाबतची उत्तरे मिळत नाही. निवडणूक आयोगाकडे याबाबत प्रशासनाने कळविले असल्याचे सांगण्यात येते. आता पाहू या काय निर्णय होतो.     -जयप्रकाश परदेशी, प्रभाग चारमधील उमेदवार

निवडणुकीसाठी अर्ज तर भरला पण संपूर्ण गावात प्रचार चालू असताना आम्हाला मात्र शांत बसावे लागत आहे. दुस:या उमेदवारांच्या प्रभागात जाऊन त्यांचा प्रचार आम्ही सध्या करीत आहोत. आमचे काय होईल हा प्रश्न मात्र नेहमीच सतावतो.     -बलोच अ.ह. गुलाम कादर, प्रभाग चारमधील उमेदवार

Web Title: Who will vote for voting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.