जिल्हा परिषदेत विरोधक आता नेमका कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:07 PM2020-01-28T12:07:40+5:302020-01-28T12:08:47+5:30

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सत्ताधारी शिवसेनेचा गेम करीत भाजपने किंगमेकरची भुमिका बजावत आपल्या एका सदस्याला ...

Who exactly is the opponent in the Zilla Parishad? | जिल्हा परिषदेत विरोधक आता नेमका कोण?

जिल्हा परिषदेत विरोधक आता नेमका कोण?

Next

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सत्ताधारी शिवसेनेचा गेम करीत भाजपने किंगमेकरची भुमिका बजावत आपल्या एका सदस्याला सभापतीपदी विराजमान केले. जिल्हा परिषदेत आता प्रमुख तिन्ही पक्ष सत्तेचे वाटेकरी झाल्याने विरोधक कोण राहणार हा प्रश्न कायम राहणार आहे. दरम्यान, सेनेचा पराभव, ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांच्या पूत्राचा दारून पराभव माजी मंत्री सुरुपसिंग नाईक आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या जिव्हारी लागला असून मुरलेल्या या राजकीय नेत्यांची आगामी रणनितीकडे आता लक्ष लागून आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळी होणारा गेम अखेर भाजपने सभापती निवडीच्या वेळी केलाच. काँग्रेस व शिवसेनेची आघाडी असतांना व अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर या दोन्ही पक्षाचे सदस्य विराजमान असतांना झालेली ही तोडफोड राजकारणातील निती आणि मुल्य यांना तिलांजली देणारी ठरली आहे.
जिल्हा परिषदेतील बलाबल पहाता काँग्रेसकडे २३ त्यांचा अध्यक्ष व तीन सभापती, भाजप व राष्टÑवादीचा गट मिळून २६ त्यांच्याकडे एक सभापती तर शिवसेनेकडे सात सदस्य त्यांच्याकडे उपाध्यक्ष. परिणामी तिन्ही पक्ष सत्तेत आले आहेत. राजकीय इतिहासातील ही दुर्मिळ बाब मानली जात आहे.
जिल्हा परिषदेत सर्वाधिक २६ सदस्यांचा गट भाजपचा असतांनाही शिवसेनेने काँग्रेसशी आघाडी केल्याने भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे भाजपने ही उट्टे काढण्यासाठी शिवसेनेचाच गेम करण्याचे ठरविले होते. उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळीच हा प्रकार घडणार होता, परंतु व्हिपची अडचण आली आणि सेनेचा मार्ग सुरळीत झाला, परंतु सभापतीपदाच्या निवडीच्या वेळी भाजपने आपला मनसुबा पुर्ण केलाच. सभापतीपदासाठी जयश्री दिपक पाटील यांनी भाजपतर्फे अर्ज भरला त्यावेळीच काहीतरी गेम होणार याची कुणकुण लागली होती.
महिला-बालकल्याण आणि समाज कल्याण समिती सभापतीपदांची निवडणूक भाजपने माघार घेत बिनविरोध केली. विषय समितीच्या दोन सभापतीपदांसाठी जयश्री पाटील यांचा अर्ज कायम राहिला. पाच उमेदवार असल्याने हात उंचावून मतदान घेतांना प्रत्येक सदस्याला केवळ दोन वेळाच मतदानाचा अधिकार होता. ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र अजीत नाईक यांना त्यांच्याच तालुक्यातील केवळ पाच सदस्यांनी पाठींबा दिला. शिवसेनेच्या गणेश पराडके यांना सेनेच्या सात आणि काँग्रेसच्या चार जणांनी त्यात नवापूर तालुक्यताील तीन व नंदुरबार तालुक्यातील एक अशा ११ जणांनी मतदान केले. शंकर पाडवी यांना सेनेच्या सात आणि काँग्रेसचे नंदुरबार तालुक्यातील एक अशा आठ जणांनी मतदान केले. दुसरीकडे काँग्रेसचे अभिजीत पाटील यांना काँग्रेसच्या १९ तर भाजपच्या सर्वच २५ जणांनी असे एकुण ४४ जणांनी तर जयश्री पाटील यांना भाजपच्या २५ जणांनी आणि काँग्रेसच्या १७ जणांनी असे एकुण ४२ मतदान मिळाले. या ठिकाणी सेनेचा गेम करतांना अजीत नाईक यांचाही गेम अनपेक्षीतरित्या झाला. दोन दिवसांपूर्वी साखर कारखान्यातील कार्यक्रमात पालकमंत्र्यांची उपस्थिती बरेच काही सांगून जात होती. त्यामुळे साखरेचे गोड समिकरण गेम चेंजसाठी महत्त्वाचे ठरल्याचे बोलले जात आहे.

बांधकाम समिती आता कुणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेत बांधकाम व अर्थ समिती ही महत्वाची मानली जाते. या समितीवर शहादा तालुक्यातील दोन्ही सभापतींचा दावा आहे. शिवसेना अर्थात उपाध्यक्ष यांचा त्यावर दावा होता. परंतु शिवसेना आता एकटी पडल्याने काँग्रेस शिवसेनेला महत्वाची समिती देईल ही बाब अशक्य समजली जात आहे. त्यामुळे अर्थ, बांधकाम कुणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सुरुपसिंग नाईक व चंद्रकांत रघुवंशी गटाचा काँग्रेसच्या एका गटाने आणि भाजपने दारून पराभव केला. परिणामी दोन्ही मुरब्बी नेत्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणातील बॅकफूटवर जाण्याची घटना ठरली आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते आता या पराभवाचे आणि दगाबाजी करणाऱ्यांचे उट्टे कसे काढतात याबाबत उत्सूकता आहे.

उपसभापती निवडीच्या वेळी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, आमशा पाडवी उपाध्यक्षांच्या केबीनमध्ये बसून होते. समाज कल्याण व महिला बालविकास समितीची निवडणूक झाल्यानंतर चंद्रकांत रघुवंशी हे सभागृहाच्या बाहेर दरवाजाजवळ गेले. तेथे कुणाशी काहीतरी बोलले नंतर पुन्हा दालनात येवून बसले. त्यानंतर या चारही नेत्यांच्या चेहºयावरील तणाव बरेच काही सांगून जात होता. सेना नेत्यांच्या कानावर ही सर्व घडामोड टाकणार असल्याचे सांगून काँग्रेसने दगाफटका केल्यामुळे यावेळी संतापही व्यक्त करण्यात आला.

Web Title: Who exactly is the opponent in the Zilla Parishad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.