कोठे बंडखोरी, तर कोठे संताप निवळला
By Admin | Updated: October 3, 2014 13:16 IST2014-10-03T13:16:37+5:302014-10-03T13:16:37+5:30
चोपड्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रारंभापासून प्रबळ दावेदार असलेले डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या पक्षाच्या उमेदवारास बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे.

कोठे बंडखोरी, तर कोठे संताप निवळला
>जळगाव : जिल्ह्यात बंडखोरी फारशी नसली तरी चोपड्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे प्रारंभापासून प्रबळ दावेदार असलेले डॉ.चंद्रकांत बारेला यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने या पक्षाच्या उमेदवारास बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे. मात्र चाळीसगावमध्ये भाजपातील बंडखोरी टळली आहे.
जिल्ह्यातील विधानसभेच्या ११ मतदारसंघांच्या निवडणूक कार्यक्रमातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपली.
भाजपा-शिवसेनेची युती व कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी दुभंगल्याने एकेकाळी खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी होणारे आता एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले आहेत.
यात काहींना वर्षानुवर्षे उमेदवारीसाठी प्रतीक्षा करावी लागली पण आता आघाडी व युती फुटल्याने या हौशी मंडळींना आपले नशीब अजमाविण्याची संधी मिळाली आहे.
काही पक्षांमध्ये चुरस
काही पक्षांमध्ये उमेदवारीसाठी प्रारंभापासून मोठी चुरस होती. यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपातर्फे इच्छुकांची यादी मोठी होती.
विरोधी पक्षनेते आमदार एकनाथराव खडसे यांनी शिफारस केलेल्या कैलास सूर्यवंशी यांनी प्रचाराला गती दिली असतानाच या मतदारसंघातून ऐन वेळी उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे कैलास सूर्यवंशी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यातच पक्षाचे माजी खासदार एम.के.अण्णा पाटील यांनी त्यांचे पुत्र रामदास पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र यश मिळत नाही, असे पाहून त्यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवधनुष्य हाती धरले.
मात्र सूर्यवंशी यांचे बंड शमल्याने भाजपा उमेदवारास तूर्त दिलासा मिळाला आहे.
चोपड्यात बंडखोरी
चोपडा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. मतदारसंघात नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून प्रारंभापासून उमेदवारीचे दावेदार म्हणून डॉ.चंद्रकांत बारेला यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाकडून डावलले गेल्यामुळे त्यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने चोपडा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारास या बंडखोरीस सामोरे जावे लागणार आहे.
पाचोर्यातील बंडखोरी टळली
पाचोरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे महिला जिल्हाध्यक्षा अस्मिता पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता.
मात्र पक्षाकडून विद्यमान आमदार दिलीप वाघ यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. अस्मिता पाटील यांना पक्षाकडून सूचना आल्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील बंडखोरी टळली.
रावेरला बंडखोरी
रावेरविधानसभा मतदारसंघातील पंचरंगी लढतीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसेत जुंपली असली तरी मतदारसंघात मुस्लीम समाजाच्या बरोबरीनेच असलेली दलित समाजाची ४0 हजार मतदारांची एकठोक 'व्होटबँक' पदरात टाकण्यासाठी रिपाइं (आ) गटाचे प्रदेश उपाध्यक्ष व रिप. केळी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर तायडे यांनी भाजप-रिपाइं (आ) च्या महायुतीशी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे युतीपुढे एक आव्हान उभे ठाकले आहे. भुसावळात गटबाजी..
भुसावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील दोन गटांचा वाद वर्ष दीड वर्षापासूनचा. पक्षनेतृत्वाचा कधी एका गटाला तर कधी दुसर्या गटाला आशीर्वाद. परिणामी पालिका ते विधानसभा ही गटबाजी फुलतच राहिली. शहर अध्यक्ष निवडीच्या वादातून पक्षश्रेष्ठींनी पालकमंत्री संजय सावकारे गटाला धक्का दिल्याने सावकारेंना आपली उमेदवारी संकटात असल्याचे लक्षात आले व त्यांनी भाजपाची वाट धरली. राष्ट्रवादीला हा धक्काच होता. युती दुभंगल्याने भाजपाने या मतदारसंघातून संजय सावकारे यांना उमेदवारी दिली आहे.